सावधगिरी हाच कॅन्सरमधून बाहेर पडण्याचा उत्तम उपाय
जळगाव

सावधगिरी हाच कॅन्सरमधून बाहेर पडण्याचा उत्तम उपाय

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

‘देशदूत फेसबुक लाईव्ह संवाद कट्ट्या’वर उमटला सूर

कॅन्सर होण्याचे विशिष्ट असे कोणतेही निश्चित कारण नाही. कॅन्सर केव्हाही आणि कसाही, कुणालाही होऊ शकतो. त्यामुळे सावधगिरी हाच कॅन्सरपासून दूर राहण्याचा किंवा बाहेर पडण्याचा उत्तम उपाय असल्याचा सूर ‘देशदूत लाईव्ह संवाद कट्ट्या’वर उमटला.

शुक्रवारी जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर कॅन्सरग्रस्त महिलांसाठी काम करणार्‍या ‘आम्ही मैत्रीणी’ गृपच्या सदस्या डॉ.उषा शर्मा, डॉ.श्रध्दा चांडक, सुनिता त्रिवेदी, ललिता चौधरी या चर्चेत सहभागी झाल्या होत्या. सहभागी महिलांचे कार्यकारी संपादक अनिल पाटील यांनी स्वागत केले. यावेळी उषा शर्मा म्हणाल्या की, आकाशवाणीत काम करतांना खुप डॉक्टरांच्या मुलाखती घेतल्या असल्याने मला माझ्या शरिरात काहीतरी बदल होतोय हे जाणवले. तपासण्या केल्या असता कॅन्सर असल्याचे निदान झाले.

रेवती ठिपसे या मैत्रीणीच्या मदतीने मी कॅन्सरशी लढा देऊ शकले. त्या माध्यमातूनच मी आम्ही मैत्रीणी गृपशी जोडली गेली. आज कॅन्सरमधून बाहेर पडल्यामुळे आम्ही स्वत:ला विरांगणा समजतो, असेही त्या म्हणाल्या. आम्ही मैत्रीणी गृपच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या दुर्बल अश्या कॅन्सर रूग्णांना आम्ही मदत करतो. कॅन्सरशी झुंज देत असतांना मिळालेल्या प्रेरणेतूनच ‘पराजीत काळरात्री’ हे स्व अनुभवावरचे पुस्तक मी लिहू शकले.

पुढे जाऊन माझ्या याच पुस्तकाला साहित्य अकादमीचा पुरस्कारदेखील मिळाला. कॅन्सरची भिती न बाळगता आत्मविश्वासाने त्यातून बाहेर पडण्याचा निश्चय केला तर कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारावर देखील आपण मात करू शकतो, असेही त्यांनी अभिमानाने सांगितले.

डॉ.श्रध्दा चांडक म्हणाल्या कि, कॅन्सरसारखा आजार होण्यासाठी या आजाराचा इतिहासच हवा, असे काही नाही. जिवघेण्या रसायनांच्या अति वापरामुळे मनुष्याच्या शरीरातील जीवनसत्वे दिवसेंदिवस कमी होत चालली आहेत. त्यासोबतच बदलत्या जीवनशैलीचा परिणाम देखील महिलांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होवू लागला आहे. अनुकरणामुळे आपण मुळ भारतीय संस्कृती विसरत चाललो आहे त्यामुळेच पूर्वी चाळीशीनंतर होणारा स्तन कॅन्सरसारखा दुर्धर आजार आता विशीतल्या तरूणींना देखील होवू लागला आहे.

Deshdoot FB Live : कॅन्सर सपोर्ट ग्रुप ‘आम्ही मैत्रीण’ यांचेशी महिला दिनानिमित्त मुक्तसंवाद- सहभाग : डॉ.उषा शर्मा, ललीता चौधरी, डॉ.श्रध्दा चांडक दि.६ मार्च २०२०

Deshdoot ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶುಕ್ರವಾರ, ಮಾರ್ಚ್ 6, 2020

अलीकडच्या काळात देखील भितीपोटी अनेक लोक पुढे येत नाही. महिला आपल्या शरीरातल्या बदलांकडे लक्ष देत नाही. ज्या ठिकाणाहून उपचार घेतले पाहिजे तेथून उपचारही घेतले जात नसल्यामुळे दिवसेंदिवस कॅन्सरसारखे आजार बळावत चालले आहे. संवादातून भिती कमी होते. ही भिती घालवण्यासाठी संवाद वाढविणे गरजेचे आहे.

त्यासोबतच सिनेमावर भक्ती ठेवण्यावर लोकांची संख्या आजही खुप आहे. त्यामुळे सिनेमात सत्यता दाखवली जाणे देखील गरजेचे आहे. शिळे अन्न खाण्याचे प्रमाण महिलांमध्ये मोठे आहे. मासिक पाळीत होणार्‍या रक्तस्त्रावाकडे महिला लक्ष देत नाही. त्यामुळे महिलांमध्ये अ‍ॅनेमियासारखे आजार बळावतात. कॅन्सरसह इतर आजारांच्या तपासण्या आता गाव पातळीवर देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे महिलांनी दैनंदिन आरोग्य तपासण्या करणे देखील गरजेचे असल्याचेही डॉ.चांडक यांनी सांगितले.

तब्बल तीन वेळा कॅन्सरवर मात करून त्यातून सहिसलामत बाहेर पडलेल्या ललिता चौधरी म्हणाल्या की, मला पहिल्यांदा वयाच्या सोळाव्या वर्षी कॅन्सर निष्पन्न झाला होता. त्यानंतर 2017 आणि 2019 ला पुन्हा कॅन्सर उन्मळून आला.

मात्र कुटूंबाचा पाठिंबा आणि आम्ही मैत्रीणीसारख्या गृपच्या बळावर मी तीनही वेळा कॅन्सरवर मात करू शकले, असेही त्या म्हणाल्या आज कॅन्सरग्रस्त महिलांसाठी काम करतांना मला स्वत:ला कॅन्सर होता. अशी कोणतीही आठवण मला येत नाही. हे देखील सौ.चौधरी यांनी आवर्जून सांगितले.

कॅन्सरमधून बाहेर पडलेल्या सुनीता त्रिवेदी म्हणाल्या की, माझ्या स्वप्नातही नव्हते. मला कॅन्सर होईल. मात्र मला कॅन्सर निष्पन्न झाल्यानंतर पायाखालची वाळूच सरकली होती. कॅन्सर म्हणजे थेट मरणाची भिती प्रत्येकाला वाटत असते. आत्मविश्वास आणि पाठबळाच्या भरवश्यावर आपण कॅन्सरमधून बाहेर पडू शकतो हे मला स्वत:वरून जाणवले आहे, असेही त्यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com