12 लाख पशूधनाचे लसीकरण रखडले
cattle vaccination

12 लाख पशूधनाचे लसीकरण रखडले

लसीच्या पुरवठ्याचा अभाव; करोनाच्या काळात पशुसंवर्धन विभागासमोर आव्हान

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जल्ह्यात पशुधनाची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात गायवर्ग पशुधनाची संख्या 5 लाख 52 हजार 213 असून त्यानंतर म्हसवर्ग पशुधनाची संख्या 2 लाख 57 हजार 492 इतकी आहे.

यंदा लसीकरणासाठी काहीसा उशीर झाला असला तरी शेतकरी बांधवांनी काळजी करण्यासारखे काही नाही. पुढच्या आठवड्यात लस उपलब्ध होणार आहे. जिल्ह्याभरात 20 ते 21 दिवसात लसीकरण पूर्ण केले जाईल. प्रत्येक गावांपर्यंत पाळीव जनावरांच्या लसीकरणासाठी जिल्हा परिषदेची यंत्रणा कार्यरत राहणार आहे. लस आल्यानंतर लगेच पाळीव जनावरांचे लसीकरण सुरु होईल.

डॉ. अविनाश इंगळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी,जि.प.जळगाव

याशिवाय शेळी 3 लाख 49 हजार 103, तर मेंढ्या 38 हजार 156 अशी एकूण 11 लाख 96 हजार 964 जिल्ह्यात जनावरांची संख्या आहे. जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव जनावरांना होणार्‍या तोंडखुरी,पायखुरी यासह इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होण्यासाठी मे महिन्यात लसीकरण मोहीम राबविली जाते.

मात्र,यंदा शासनातर्फे अद्यापी लसीचा पुरवठा न झाल्याने जनावरांचे लसीकरण रखडले आहे. एकीकडे कोरोनाच्या लसींचा तुटवडा होत असल्यामुळे माणसांचे लसीकरण लांबत आहे. तर दुसरीकडे शासनातर्फे पाळीव जनावरांना दिली जाणारी लस उपलब्ध न झाल्यामुळे पशुपालकांसमोर गडद संकट उभे राहणार आहे.

करोनाच्या महामारीमुळे गेल्यावर्षीजनावरांचे लसीकरण उशिरा झालेे होते. यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाल्याने पुन्हा जनावरांचे जनावरांची लसीकरण मोहीम लांबले आहे. मे महिना संपण्यास एक आठवडा शिल्लक आहे. तरीही जनावरांना पावसाळ्यापूर्वी साथीच्या रोगाकरिता लसीकरण मोहीम सुरु न झाल्याने पशुपालक चिंतेत पडले आहेत.

लसीकरण मोहिमेचा कार्यक्रम रखडला

जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे जनावरांचे मान्सूनपूर्व प्रतिबंधक लसीकरण प्रत्येक वर्षी मे महिन्यात केले जाते. प्रत्येक गाव व तालुकास्तरावर यासाठी विशेष यंत्रणा तयार केली जाते. पाऊस पडल्यानंतर शेतकरी बांधव शेतीकामात व्यस्त राहत असल्याने मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लसीकरण मोहीम पूर्णत: यशस्वी केली जाते. मात्र, यंदा शासनाकडून अद्यापी लसीसाठा उपलब्ध न झाल्यामुळे पशुसंवर्धन विभागाकडून राबविला जाणारा लसीकरण मोहिमेचा कार्यक्रम रखडला आहे.

घटसर्प,फर्‍या,लाळ्या खुरकुत साथीचा प्रादुर्भाव

पावसाळ्यात पाळीव प्राण्यांना प्रामुख्यांने घटसर्प व अतिसार या विषाणूजन्य रोगाचा धोका जास्त असतो. नदी व नाल्यांना पूर आला की, या विषाणूंचा फैलाव जास्त होतो. त्यामुळे या संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण होण्यासाठी गाय, म्हशी या पाळीव प्राण्यांना घटसर्प,फर्‍या व लाळ्या खुरकूत या लसी दिल्या जातात.

मात्र, यंदा पुन्हा या लसीकरणाला विलंब झाल्यामुळे पावसाळा सुरु झाल्यावरजनावरांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तरी संबंधित विभागाने तातडीने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी बांधवांतर्फे करण्यात येत आहे.

जिल्हा पशुसंवर्धन विभागातर्फे गायी,म्हशींना पावसाळ्यापूर्वी घटसर्प,फर्‍या व लाळ्या खुरकुत या लसी दिल्या जातात. दर सहा महिन्याच्या अंतराने हे लसीकरण केले जाते. तसेच शेळ्या व मेंढ्यांना पीपीआर नावाचे लसीकरण केले जात असल्याचे जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com