आ.सौ. लताताई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द

जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ
आ.सौ. लताताई सोनवणे यांचे जात प्रमाणपत्र रद्द

चोपडा - Chopda - प्रतिनिधी :

चोपडा विधानसभा मतदार संघाच्या विद्यमान सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या जातीच्या प्रमाणपत्राला माजी आमदार जगदीशचंद्र रमेश वळवी औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने नंदुरबार येथील जात पडताळणी समिती समितीने दि.4 नोव्हेंबरच्या आदेशाने आमदार सौ. लताताई सोनवणे यांचे अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द केले आहे.जात पडताळणी समिती च्या निकालामुळे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली आहे.

चोपडा विधानसभा मतदार संघात अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी सौ. लताताई चंद्रकांत सोनवणे (शिवसेना), जगदीशचंद्र रमेश वळवी (राष्ट्रवादी), प्रभाकर गोटू सोनवणे, (भाजप बंडखोर), सौ.माधुरी किशोर पाटील (अपक्ष), डॉ.चंद्रकांत जामसिंग बारेला (अपक्ष) या प्रमुख उमेदवारांमध्ये चुरशीची लढत झाली होती.

2019 च्या निवडणूकीत सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे या निवडून आल्या होत्या. तर राष्ट्रवादीचे जगदीशचंद्र रमेश वळवी यांना दुसर्‍या क्रमांकाची मते मिळाली होती.

निवडणूकी नंतर पराभूत उमेदवार तथा माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी आमदार सौ.लताताई सोनवणे यांच्या अनुसूचित जमातीच्या जात प्रमाणपत्राला औरंगाबाद येथील उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.

उच्च न्यायालयाच्या आदेशाने नंदुरबार येथील जात पडताळणी समितीच्या चौकशीत उपविभागीय अधिकारी जळगाव यांनी लताताई महारु कोळी तथा आमदार सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांना निगर्मित केलेले टोकरे कोळी जाती चे प्रमाणपत्र रद्द केल्याचे आदेश जात पडताळणी समिती नंदुरबार यांनी दि.4 नोव्हेंबर 2020 रोजी काढले आहेत.

तसेच आमदार सौ.लताताई सोनवणे यांनी विधानसभा निवडणूकी पूर्वी जळगाव महानगर पालिकेच्या निवडणूकीत अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठी निवडणूक लढवली होती.या निवडणूकीत सौ. सोनवणे यांनी सादर केलेले टोकरे कोळी जातीचे प्रमाणपत्र देखील जात पडताळणी समिती नंदुरबार यांनी रद्द ठरविले आहे.

तसेच अर्जदार यांनी मूळ जमातीचे प्रमाणपत्र जप्त करण्यासाठी आदेश प्राप्त झाल्यापासून आठ दिवसांच्या आत नंदुरबार येथील जात पडताळणी समिती कार्यालयाकडे जमा करावे.अर्जदार यांनी अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या प्रवर्गातून निवडणूक लढवली असल्यामुळे तसेच अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या आधारे देय नसलेला लाभ मिळवलेला असल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र अनुसूचित जाती,अनुसूचित जमाती,विमुक्त जाती,भटक्या जमाती,इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग ( जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पळताळणीचे विनियमन ) अधिनियम,2000 च्या कलम-10 व 11 अन्वये उचित कारवाई करण्यात यावी व केलेली कारवाई जात पडताळणी समिती नंदुरबार कार्यालयास अवगत करावी असे देखील समितीच्या दि.4 नोव्हेंबर 2020 च्या आदेशात म्हटले आहे.

देर है पर अंधेर नाही - माजी आ.जगदीशचंद्र वळवी

जात पडताळणी समितीच्या निर्णयाबाबत माजी आ.जगदीशचंद्र वळवी यांनी भगवान के घर देर है पर अंधेर नही ! अशी मार्मिक व मिश्किल प्रतिक्रिया दिली. या निर्णयाचा मला, परिवाराला, कार्यकर्ते व नेत्यांना आनंद झाला आहे.उशिरा का असेना माझ्या आदिवासी बांधवांना न्याय मिळाला आहे. आजच्या निकालाने न्याय व्यवस्थेवरील माझा विश्वास द्विगुणित झाला आहे.असे चोपड्याचे माजी आमदार जगदीशचंद्र वळवी यांनी ‘देशदूत’ला सांगितले.

जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागणार

नंदुरबार येथील जात पडताळणी समितीने अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र रद्द केल्याचा निर्णय दिला आहे. परंतू जात पडताळणी समितीच्या निर्णयाविरुद्ध औरंगाबाद खंडपीठात दाद मागणार आहे. आमचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून, आम्हाला न्याय मिळेल, अशी प्रतिक्रिया आ.सौ.लताताई चंद्रकांत सोनवणे यांचेवतीने खाजगी सचिव गणेश भोईटे यांनी ‘देशदूत’ला दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com