गावठी पिस्तूलसह काडतूस जप्त

अमळनेर पोलीसांची कामगिरी
गावठी पिस्तूलसह काडतूस जप्त

अमळनेर- प्रतिनिधी- Amalner

गावठी पिस्तुलांची खरेदी-विक्री करून शहरात माफियाराज फैलवू पाहणाऱ्यांचे मनसुबे अमळनेर पोलिसांनी उधळून लावायला सुरुवात केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खोलवर पाळेमुळत खोदत आणखी दोघांना गावठी पिस्तूल आणि जीवंत काडतुसासह ताब्यात घेतले आहे अमळनेर पोलिसांच्या या चौकस कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलिसांनी काही दिवसांपूर्वी एका गावठी पिस्तुल विक्रेत्याला अटक केल्यानंतर त्याने अमळनेर, भुसावळ आणि जळगाव येथे गावठी पिस्तुल विक्री केल्याचे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला सांगितले होते. मात्र गावठी पिस्तुल शोधण्यात पोलिसांना यश येत नव्हते.

तर दोन दिवसापूर्वीच चोपडा येथून गावठी पिस्तूल घेऊन पळ काढल्याने धुळे तालुक्यातील शिरूड येथील राजेश गणेश गुरखा आणि धुळे येथील साक्री रोडवरील मलदरसिंग गुरुमुखसिंग शिकलकर यांचा अमळनेर पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून मुसक्या आवळल्या होत्या. अमळनेर पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्तुल जप्त केले होते.

त्यामुळे शस्त्रसाठा जमवून विपरीत घडवण्याच आणि माफियाराजचे कटकारस्थान सुरू असल्याचे स्पष्ट झाले होते. म्हणून सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश सदगीर, हेडकॉन्स्टेबल दीपक विसावे, हेडकॉन्स्टेबल भटूसिंग तोमर, नाजीमा पिंजारी, सुनील पाटील ,दीपक माळी, शरद पाटील, रवी पाटील, यांच्या पथकाने आपल्या हेरांच्या माध्यमातून सखोल माहिती काढून निंभोरा कलाली मार्गावर स्वप्निल ईश्वर पाटील याला सापळा रचून जाळ्यात अडकवला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली.

मात्र त्याला पोलिसी खाक्या दाखवताच पोपटासारखा बोलू लागला. त्याने अमळनेर येथील एका हॉस्पिटलच्या आई मेडिकल वरील जितेंद्र साहेबराव पाटील याला गावठी पिस्तूल आणि चार जीवंत काडतूस दिल्याचे सांगितले. पोलिसांनी तडक आपला मोर्चा मेडिकलवर वळवला. तेथे जितेंद्रला ताब्यात घेऊन त्यालाही पोलिसी खाक्या दाखवल्याने त्याने मेडिकल दुकानाच्या ड्रॉवरमधून पिस्तूल व काडतुसे काढून दिली.

याप्रकरणी दोघांविरुद्ध शस्र कायदा ३/२५ व भादंवि कलम ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक केली आहे. दोन्ही आरोपीना अमळनेर न्यायालयात हजर केले असता त्यांना न्या. वाय. जे. वळवी यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

आणखी काही धागेदोरे गवसण्याची शक्यता

अमळनेर तालुक्यातील धुळे रोडवर तसेच अन्य ठिकाणी गेल्या काही दिवसांत रस्ता लुटीच्या घटना घडल्या आहेत. त्यात तरुणाई गुन्हेगारीकडे वळू पाहत असल्याने पोलिसांना गुन्हेगारांचा शोध घेणे कठीण जात आहे. तसेच लुट आणि गावठी पिस्तुलांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

सायंकाळनंतर एकटेदुखटे बाहेर पडण्यासही धजावत नव्हते. त्यामुळे पोलिसांपुढे मोठे आव्हान असल्याने त्यांनी या गुन्ह्यात सखोल चौकशी करून त्याचे पाळेमुळे खोदण्याचा प्रयत्न केल्याने मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे गवसण्याची शक्यता एपीआय सदगीर व त्यांच्या पथकाने वर्तवली असून त्यांच्या या विशेष कामगिरीचे अमळनेरकरांकडून विशेष कौतुक होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com