बलात्काराच्या गुन्ह्यात जामीनावर सुटल्यावर घरफोडी

वय वर्षे २०, तरुणावर पाच घरफोडीसह १२ गुन्हे आहेत दाखल
बलात्काराच्या गुन्ह्यात जामीनावर सुटल्यावर  घरफोडी

जळगाव - Jalgaon

शहरातील मेहरुण (Mehrun) येथील गणेशनगरातील युनुस कालू खान (वय ६४) या सेवानिवृत्त शिक्षकाच्या बंद घरातून ६४ हजार रुपयांचा ऐवज लांबविणार्‍याप्रकरणी एमआयडीसी पोलीस (MIDC Police) ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात मोहनसिंग जगदीशसिंग बावरी वय २०, फरीद उर्फ गुल्ली मोहम्मद मुलतानी वय १९ दोन्ही रा. तांबापुरा या संशयितांसह एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. तर दोघा संशयितांना जिल्हा न्यायालयाने ६ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेतील मोहनसिंग हा सराईत गुन्हेगार असून बलात्काराच्या गुन्ह्यात जामीनावर सुटल्यावर त्याने ही घरफोडी केल्याची माहिती समोर आली आहे.

सेवानिवृत्त शिक्षकाचे घरुन लांबविला ६४ हजारांचा ऐवज

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युनूस शेख हे मेहरुणमधील गणेश नगरात पत्नी सायरा बानो खान यांच्यासह वास्तव्याला आहेत. मुलगा रिजवान ठाणे येथे वास्तव्याला असल्याने १२ जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता घराला कुलूप लावून दाम्पत्य ठाण्याकडे रवाना झाले. गुरुवार २९ जुलै रोजी सकाळी साडे सहा वाजता ते घरी आले असता घराच्या कंपाऊंडला कुलूप लावलेले होते. ते उघडल्यावर आतमध्ये गेले असता मुख्य दरवाजाचे कुलूप व कडी तुटलेली होती. घरातील साहित्य अस्ताव्यस्त केले होते. कपाटातील ड्रावर पलंगावर ठेवले होते. त्यातील ४० हजार रुपये रोख, १२ हजार रुपये किमतीचे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मीनी चैनल पेंडल, सहा हजार रुपये किमतीच्या ५ ग्रॅमच्या सोन्याच्या रिंगा, ५ ग्रॅमच अंगठी असा ६४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरुन नेल्याचे समोर आले होते. घरात चोरी झाल्याची खात्री पटल्यानंतर खान यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सय्यद, मुदस्सर काझी, गोविंदा पाटील, सुधीर साळवे, साईनाथ मुंडे यांच्या पथकाने संशयित मोहनसिंग, फरीद याच्यासह १७ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले होते. संशयित मोहनसिंग याच्यावर घरफोडीचे बरेच गुन्हे दाखल असून त्याचे संपूर्ण भावाविरुद्ध सुद्धा घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. संशयित दोघांना बुधवारी जिल्हा न्यायालयात न्या. ए.एस. शेख यांच्या न्यायालयात हजर केले असता न्या. शेख यांनी दोघांना ६ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सरकारतर्फे ऍड. प्रिया मेढे यांनी कामकाज पाहिले. सहायक फौजदार अतुल वंजारी या गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com