जिल्हाभरातील इच्छुक हिरमुसले : कारभार प्रशासकाच्या हाती जाणार

जिल्हाभरातील इच्छुक हिरमुसले : कारभार प्रशासकाच्या हाती जाणार

७०४  ग्रा.पं.च्या निवडणुकांना ‘ब्रेक’

आगामी ऑगस्टमध्ये जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींच्या होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांना कोरोनाचा फटका बसला असून राज्य शासनाने केलेल्या विनंतीनुसार निवडणूक आयोगाने या निवडणुका स्थगित केल्याने दोन महिन्यांनंतर विद्यमान पदाधिकार्‍यांचा कार्यकाळ संपल्यानंतर या 704 गावांचा कारभार प्रशासकांच्या हाती जाणार आहे. साधारणत: जूनपासून सुरू होणारी ही प्रक्रिया ऑगस्टमध्ये पूर्ण होते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत सरपंचांची निवड होत असते. मात्र यावेळी कोरोनाने अनेकांच्या स्वप्नांवर पाणी फिरविले आहे.

जळगाव जिल्ह्यात दि. 4 ऑगस्ट 2015 रोजी 704 ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. त्यानंतर महिनाभरात सरपंचांची निवड झाल्यानंतर या गावांचा कारभार निवड झालेल्या सदस्यांच्या हाती गेला होता. जिल्ह्यातील 704 ग्रामपंचायतींसाठी डिसेंबर 2019 मध्येच निवडणुकांच्या तयारीला प्रारंभ झाला होता. त्यासाठी वॉर्ड रचना करण्यात आल्या तर हरकती मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर प्रारुप मतदार यादी प्रकाशित करण्याच्या तयारीला वेेग आलेला असतानाच कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने हा कार्यक्रम मागे पडला.

कोरोनाच्या लढ्यात सारेच सहभागी झाले. स्थानिक पदाधिकार्‍यांवर-देखील गावाची जबाबदारी आली.प्रत्येक गावात सरपंच व पोलीस पाटलांवर प्रशासनाने जबाबदारी सोपविल्याने आजपर्यंतही पदाधिकारी जबाबदारी पार पाडत आहेत. या काळात निवडणुका घेणेे शक्य नसल्याने राज्य सरकारच्या वतीने निवडणूक आयोगाला विनंंती करीत राज्यातील ग्रामपंचायती निवडणुका पुढे ढकलण्याची विनंती केली. ही विनंती आयोगाने मान्य केल्याने या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे बदललेल्या राजकीय समीकरणानंतर पहिल्यांदाच या निवडणुका होणार होत्या.त्यामुळे सर्वांनाच याची उत्सुकता होती. भाजपाला सत्तेबाहेर ठेवत राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. त्याचे परिणाम जिल्ह्यातील राजकारणावरदेखील उमटले. शिवसेेनेेचे नेते पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्याचे पालकमंत्री असल्याने महाविकास आघाडीची जबाबदारी अर्थातच त्यांच्या खांद्यावर होती तर गतवेळी ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत सत्तेत असलेेली भाजपा आता विरोधी पक्षात असून एकनाथराव खडसेंना भाजपानेच बाजूला सारल्याचे चित्र आहे.

भाजपाचे चार आमदार गिरीश महाजन, राजूमामा भोळे, मंगेश चव्हाण, संजय सावकारे आपापल्या मतदारसंघात काय प्रभाव पाडतात, हे यातून समोर येणार होते. राष्ट्रवादीचे एकमेव आमदार अनिल भाईदास पाटील यांचीही या निवडणुुकीत कसोटी लागणार होती. मुक्ताईनगरात अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा प्रभाव किती, हेदेखील समोर येणार होेतेे. रावेरात काँग्रेसचे एकमेव आमदार शिरीष चौधरी तर पाचोर्‍यात शिवसेनेचे किशोर पाटील, पारोळ्यात चिमणराव पाटील, चोपड्यात लताताई सोेनवणे यांच्या नेतृत्वाची परीक्षा या ग्रामपंचायत निवडणुकीत होणार होती.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com