गिरणा नदीपात्रात मृतदेह सापडलेला तरुण बांभोरीचा रहिवासी

ओळख पटली ; नदी पार करतांना पाय घसरुन पडल्याचा अंदाज
गिरणा नदीपात्रात मृतदेह सापडलेला तरुण बांभोरीचा रहिवासी

जळगाव - Jalgaon :

तालुक्यातील सावखेडा शिवारातील गिरणा नदीपात्रात काल मंगळवारी अनोळखी तरुणाचा मृतदेह आढळून आला होता.

दरम्यान त्या तरुणाची आज बुधवारी सकाळी ओळख पटली आहे. सुनील जानकीराम नन्नवरे वय ३२ रा. बांभोरी असे मयत तरुणाचे नाव आहे. तो १६ तारखेपासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली आहे.

मयताने त्याच्या कमरेला चप्पल बांधलेली होती. त्यावरुन नदी ओलांडत असतांना खोल खड्यात पाय घसरुन पडल्याने बुडून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

तालुक्यातील सावखेडा बुद्रक येथील पोलीस पाटील चंद्रकांत उत्तमराव सोनवणे यांना मंगळवारी दुपारी गावालगत असलेल्या गिरणानदीपात्रात अनोळखी तरुणाचा मृतदेह पडलेला असल्याची माहिती मिळाली होती.

अनेक दिवसांपासून मृतदेह पाण्यात पडून असल्याने तो कुजला होता, तसेच त्याला दुर्गंधी सुटलेली होती. हा मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला होता. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com