अवैध वाळू वाहतुकीने घेतला चिमुरड्याचा बळी

बोदवड तालुक्यातील साळशिंगी गावाजवळील घटना
अवैध वाळू वाहतुकीने घेतला चिमुरड्याचा बळी

बोदवड - अवैधरित्या वाळू वाहतूक करणार्‍या भरधाव डंपरने चार वर्षीय बालकाला धडक देवून चिरडल्याची हृदयद्रावक घटना बोदवड-भुसावळ रस्त्यावरील साळशिंगी गावाजवळ गुरूवारी सकाळी ११:३० वाजेच्या सुमारास घडली.

या घटनेनंतर संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक केल्याने वाहनाच्या काचा फुटल्या तर डंपर चालकास संतप्त जमावाने चांगलाचं चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले.या घटनेने परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली.या अपघातात हर्षल (वय ४ वर्ष रा.नेरी बुद्रुक ता.जामनेर जि.जळगाव) या बालकाचा करुण अंत झाला.

याबाबत अधिक असे की, शांताराम हरी इंधाटे (६४ नेरी बुद्रुक,ता.जामनेर) हे आपला नातू हर्षलसह (एम.एच १९ डी.एच ९७४२) या दुचाकीने नेरीहून साळशिंगी येथे आपल्या मोठ्या सुनबाई सरला प्रमोद इंधाटे यांना घेण्यासाठी येत असताना त्यांचे व्याही बळीराम बाणाईत यांच्या शेताजवळ लघूशंकेसाठी त्यांनी दुचाकी लावली असता त्याचवेळी बोदवड कडून भरधाव वेगाने पिवळ्या रंगाच्या डंपरने रस्त्यावर उभ्या असलेल्या हर्षला धडक देत चिरडले व या घटनेत बालकाच्या अंगावरून चाक गेल्याने त्याचा जागीच करुण अंत झाला.अपघातानंतरही डंपर चालकाने वाहन न थांबवता काही अंतरापर्यंत पळ काढल्यानंतर संतप्त जमावाने डंपर चालकास चांगलेच बदडून काढत पोलिसांच्या ताब्यात दिले.या घटनेत संतप्त जमावाने डंपरवर दगडफेक केल्याने डंपरच्या दर्शनी भागातील काचा फुटल्या.

बोदवड पोलिसांकडून डंपर चालक प्रकाश भोई (पाडळसे, ता.यावल) यास अटक करण्यात आली असून त्याच्याविरुद्ध शांताराम इंधाटे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढिल तपास पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे करीत आहेत.

गेल्या १५ दिवसापुर्वी बोदवड रेल्वे स्टेशनच्या प्रवेशव्दाराला दारुच्या नशेत बेधुंद असलेल्या डंपर चालकाने धडक दिली होती.सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने मोठी जिवितहानी टळली.त्यामुळे येत्या दिवसात तालुक्यात सुरू असलेली अवैधरित्या वाळू वाहतुक न थांबल्यास मोठी जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी शक्यता दै देशदूत ने या आधीचं वर्तवली होती.

मात्र याकडे तहसिलदार तथा तालुका महसुल प्रशासनाने जाणीवपुर्वक दुर्लक्ष केल्याचे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही.तालुक्यात सुरु असलेल्या अवैधरित्या वाळू वाहतुकीला महसुल प्रशासनाने वेळीचं आळा घातला असता तर (४ वर्षीय) चिमुकल्या हर्षल सोबत ही दुदैवी घटना घडली नसती व त्यांच्या कुटुंबीयांवर तो त्यांना कायमचा सोडून गेल्याचा हा दुःखाचा डोंगर कोसळला नसता.

दुदैवाने आज एका चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागला असून किमान आता तरी तालुक्यात सुरु असलेली अवैधरित्या वाळू वाहतुक तहसिलदार यांनी कायमची बंद होईल असा बंदोबस्त करावा अशी मागणी तालुक्यातून केली जात आहे.त्यामुळे तालुक्यातील सुरु असलेली अवैध वाळू वाहतुक बंद होईल की नाही? हे येत्या काही दिवसांत तालुक्यातील जनतेस पाहावयास मिळणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com