जिल्हा पोलीस अधीक्षकांसह 121 कर्मचार्‍यांचे रक्तदान

सामाजिक संस्थांनकडून 17 हजार मास्कचे वाटप
जिल्हा पोलीस अधीक्षकांसह 121 कर्मचार्‍यांचे रक्तदान

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोनाकाळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. पोलीस कर्मचार्‍यांनी रक्तदानासाठी पुढाकार घेतला असून पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्यासह 121 अधिकारी कर्मचार्‍यांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.

जिल्हा पोलीस दल व रेडक्रॉस सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी सकाळी 9 वाजता पोलीस मुख्यालयातील पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

शिबिराचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नागोराव चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, विनोद बियाणी, पोलीस निरिक्षक धनंजय येरूळे, प्रताप शिकारे, बापू रोहोम, रवीकांत सोनवणे, विलास शेंडे, अनिल बडगुजर, विठ्ठल ससे, अरूण धनवडे, संतोष सोनवणे उपस्थित होते.

पोलीस अधीक्षकांचा पुढाकार

रक्तदान शिबीरात पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी स्वत: पुढाकार घेत सर्वात अगोदर रक्तदान केले. वरिष्ठ अधिकार्‍याने केलेल्या कार्याची दखल घेत तात्काळ कर्मचार्‍यांनी रक्तदान करण्यास पुढाकार घेत रक्तदान केले. सायंकाळ पर्यंत रक्तदान शिबीर सुर होते. यामध्ये जिल्हा पोलीस दलातील तब्बल 121 पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी रक्तदान करीत सामाजिक बांधिलकी जोपासली.

पोलीस दलातील कर्मचार्‍यांसाठी 17 हजार 760 मास्क वाटप

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनासह जिल्हा पोलीस दलाकडून अहोरात्र प्रयत्न केले जात आहे. यामध्ये दिवसरात्र बंदोबस्त, नाकाबंदीसाठी ते तैनात असून त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी रिपल्स ऑफ चेंज फाऊंडेशन व श्रीरामचंद्र मिशन शहाजपूर यांच्यातर्फे जिल्हा पोलीस दलासाठी एन 95 चे 17 हजार 760 मास्क पोलीस मल्टीपर्पज हॉल येथे वाटप करण्यात आले. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, प्रभारी पोलीस उपअधीक्षक दिलीप पाटील यांच्यासह दत्ता जोशी, गिरीश मुंदडा, नीवनकुमार अमलानी यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com