करोनाच्या उपाययोजनांसाठी लोकप्रतिनिधींची आग पाखड

भाजपच्या आमदार-खासदारांनी घेतली जिल्हाधिकार्‍यांची भेट
करोनाच्या उपाययोजनांसाठी लोकप्रतिनिधींची आग पाखड

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोनावर जिल्ह्यात पुरेशा उपाययोजना नाहीत. या उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आज तब्बल पाचव्यांदा भाजपच्या खासदार, आमदारांसह पदाधिकार्‍यांनी जिल्हा प्रशासनाकडे जावून समस्यांचा पाढा वाचला.

तर दुसरीकडे सद्यस्थितीतील प्रशासनाच्या नुसत्याच वांझोट्या बैठका, नियोजन शुन्य कारभार यावरुन नेतेमंडळींनी प्रचंड संताप व्यक्त केला.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. खासगी कोविड केअर हॉस्पिटल नागरिकांची प्रचंड लूट करीत असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त होत आहे.

जिल्ह्याला 83 व्हेंटीलेटर प्राप्त झाले होते. परंतु त्यातील सुमारे 80 टक्के व्हेंटीलेटर धूळखात पडले असल्याने ती अत्यंत दुर्देवी बाब आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांकडून काम होत नसेल तर त्यांनी आपली बदली करुन घ्यावी. जिल्ह्यात कोरोनावर मात करण्यासाठी पुरेशा उपायोजना होत नसल्याने तसेच रेमडेसिविरच्या पुरवठ्या संदर्भात भाजपचे खासदार उन्मेष पाटील, खा. रक्षा खडसे, जि. प. अध्यक्षा रंजना पाटील, आ. राजूमामा भोळे, आ. संजय सावकारे, आ. मंगेश चव्हाण, जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष लालचंद पाटील, स्थायी समिती सभापती राजेंद्र घुगे पाटील यांनी आज जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांची भेट घेत तक्रारींचा पाढाच वाचला. तसेच उपाययोजना करण्यात राज्य सरकार अपयशी ठरत त्यांच्यावर आगपाखड करीत संताप व्यक्त केला.

प्रशासनाच्या नुसत्या वांझोट्या बैठका- खा. उन्मेष पाटील

रेमडेसिविर पुरवठा करणार्‍या कंपनीला ऑर्डर दिल्यानंतर अ‍ॅडव्हान्स पैसे देण्याबाबत प्रशासनाकडून निर्णय न झाल्याने कंपनीने अद्याप पुरवठा केला नाही.

राज्याची ट्रास्कफोर्स टिम रुग्णांच्या जीवाशी खेळत आहे. पालकमंत्र्यांनी मिशनमोडवर काम केल पाहिजे. त्यांनी अधिकार्‍यांच्या बैठका घेवून त्यांना जाब विचारला पाहिजे.

परंतु आता हा जिल्हा दिशाहिन झाला असून जिल्ह्याला बापच उरला नसल्याचा टोला खा. उन्मेष पाटील यांनी पालकमंत्र्यांना लगावला.

उपाय योजन करण्यात राज्य शासन अपयशी- खा. खडसे

खासगी रुग्णालय जनतेची प्रचंड लूट करीत असल्याने ही लूट थांबली पाहिजे. प्रशासनाने खासगी रुग्णलयांवर नोडल ऑफिसरची नियुक्ती करावी जेणेकरुन त्याठिकाणावरील बेडची व इतर माहिती जनतेला माहिती पडेल. राज्यात दुसरी लाट येवू शकते हे माहित असतांना राज्य सरकारने आरोग्य यंत्रणा बळकट करणे अपेक्षीत होते. परंतु त्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा आरोप खा. रक्षा खडसे यांनी केला.

उपायोजनेत सरकार अपयशी- आ. राजूमामा भोळे

नागरिकांना उपचाराच्या सुविधा मिळत नसल्याने ते बेहाल झाले आहे. आरोग्य यंत्रणेकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांचा उद्रेक होवू शकतो त्याला राज्य शासनच जबाबदार राहिल. त्यामुळे राज्य शासन उपाययोजना करण्यास अपयशी ठरला असल्याचा टोला जिल्हाध्यक्ष तथा आ. राजूमामा भोळे यांनी लगावला.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com