भुसावळ (प्रतिनिधी) bhusawal

सायकल चालवण्याने ताकद, समतोल आणि समन्वय हे शारिरीक गुण वाढतात. मन उदास होणे, ताणतणाव, चिडचिडेपणा हे सर्व सायकलिंगने कमी होते. सकाळी सकाळी काही वेळ सायकल चालवली तर रात्री झोपही मस्त झोप लागते. शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारते. आजार कमी होण्यास मदत होते.

वजन कमी होते. हृदय, फुफ्फुसे आणि रक्त प्रवाह सुधारतो. मधुमेह होण्याची शक्यता कमी होत असल्याचे प्रतिपादन भुसावळ पोस्ट विभागाचे अधीक्षक पी. बी. सेलूकर यांनी केले.

ते येथील एका गृपतर्फे दि. २० रोजी आरोग्य व अध्यात्म यांचा सुरेख संगम साधत पर्यावरणाचाही समतोल साधला जावा या हेतूने मार्गशीर्ष महिना व चंपाषष्ठीचे औचित्य साधून सायकल वारी करत श्रीक्षेत्र तरसोद येथील श्रीगणरायाचे दर्शन घेतले. या वारीच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.

या सायकल वारीचा श्रीगणेशा श्री. सेलूकर यांनी सायकलमध्ये हवा भरून केला. सायकल वारीत संजय ताडेकर, डी. के. पाटील, नाना पाटील, कैलास तांबट, विलास पाटील, समाधान जाधव, प्रविण गांधेले, बी. बी. जोगी यांच्यासह ज्ञानासह मनोरंजन गृपचे डॉ. जगदीश पाटील यांनी सहभाग घेतला. भुसावळ ते तरसोद हे २० कि.मीचे अंतर सायकलस्वारांनी दीड तासात पार केले.