भुसावळ : तापीच्या पुरात अडकलेल्या दोघांचे प्राण वाचवले
जळगाव

भुसावळ : तापीच्या पुरात अडकलेल्या दोघांचे प्राण वाचवले

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

तापी नदीच्या पात्रात खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या येथील दोघांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात अडकून पडले होते. या दोघांना वाचविण्यासाठी तालुक्यातील साकेगाव येथील काही जणांनी हिंमतीने दोर बांधून त्यांना बाहेर काढल्याची घटना दि. 15 रोजी दुपारी 3 ते 3.30 वाजे दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, येथील गजानन मंदिराजवळील रहिवासी हिरालाल प्रेमसिंग बारेला व जेत्रम सिताराम बारेला हे दाघे तरूण दुपारी 1 वाजता खेकडे पकडण्यासाठी गेले होते. साकेगाव येथील एमआयडीसीच्या जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या खालील बाजूस असणार्‍यात तापी नदीच्या पात्रात त्यांनी खेकडे शोधण्यास प्रारंभ केला. ते नदी पात्रात उतरले असता तेथे पाणी नव्हते. तथापि, काही क्षणांमध्येच ते पाण्याच्या जोरदार प्रवाहात वेढले गेले. त्यांनी तातडीने घाबरून पात्रातील उंच खडकावर आश्रय घेतला. मात्र पाणी जलद गतीने वाढत गेल्याने ते भेदरले.

दरम्यान, नदी पात्रात दोन तरूण खडकावर अडकून पडल्याचे येथे फिरण्यासाठी आलेल्या विजय भोळे (रा. साकेगाव) यांना दिसले. त्यांनी तातडीने साकेगावातून काही जणांना बोलावले. यावेळी उपस्थितांनी कसे तरी करून अडकलेल्या दोन्ही जणांपर्यंत दोर पोहचवला व त्यांना सुरक्षितपणे किनार्‍यावर आणणे काही कुणाला सुचत नव्हते. ही परिस्थिती पाहून साकेगावातील पट्टीचे पोहणारे मंगल देविदास कोळी यांनी तापी पात्रात उडी मारली.

दरम्यान, पाण्याच्या प्रवाहात ते देखील वाहू लागल्याने सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी अतिशय कौशल्याने दोर पकडला. यानंतर ते दोन्ही तरूण उभे असलेल्या खडकावर ते गेले. तेथे त्यांनी खडकाला दोर मजबूतपणे बांधला. तसेच त्यांनी स्वत: तो दोर पकडून धरला. यानंतर ते दोन्ही तरूण याचाच आधार घेऊन किनार्‍यावर आले. तर मंगल कोळी हे सर्वात शेवटी दोराला धरून किनार्‍यावर आले तेव्हा उपस्थितांच्या जीवात जीव आला.

नदी पात्रातून बाहेर आल्यानंतर हिरालाल प्रेमसिंग बारेला व जेत्रम सिताराम बारेला या दोन्ही तरूणांच्या तोंडातून अक्षरश: शब्द देखील निघत नव्हता. ते प्रचंड घाबरलेले होते. या दोघांचे जीव वाचवण्यासाठी विजय भोळे, मंगल कोळी, रोशन कोळी, मुकेश कोळी, देविदास चर्‍हाटे आदींसह साकेगावकरांनी अथक परिश्रम केले.

Deshdoot
www.deshdoot.com