शालेय पोषण आहाराची परस्पर विल्हेवाट

शिंदी येथील अंगणवाडीतील धक्कादायक प्रकार
शालेय पोषण आहाराची परस्पर विल्हेवाट
अंगणवाडी पोषण आहाराची तपासणी करताना जि.प.सदस्य पल्लवी सावकारे

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

अंगणवाडीतील मुलांसाठी आलेल्या शालेय पोषण आहाराची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार तालुक्यातील शिंदी येथे उघडकीस आला आहे.

जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांना गावातील नागरिकांनी तक्रार केल्यावरुन त्यांनी अंगणवाडीत जावून पाहणी केली असता, ही चोरी पकडली गेली.

शासनाकडून बालक आणि गरोदर मातांना अंगणवाडीच्या माध्यमातून पोषण आहारांतर्गत साखर, तांदूळ, मसूर दाळ, गहू, हरभरा, हळद, तिखट, मीठ आदी एकूण ९ किलो आहार दर महिन्याला दिला जातो.

मात्र, तालुक्यातील शिंदी येथील अंगणवाडीतील शालेय पोषण आहाराची परस्पर विल्हेवाट लावली जात असल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या सदस्या पल्लवी सावकारे यांना काही ग्रामस्थांनी केली होती. त्यांनी गावात जावून अंगणवाडीत तपासणी केली असता, अंगणवाडी अधीक्षकांनी २०१९ पासून आपल्याकडे तांदूळ येत नसल्याचे सांगितले.

मात्र, सावकारे यांनी रजिस्टर आणि पावती मागितली त्यावर तांदूळाचा साठा मिळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे संतप्त झालेल्या पल्लवी सावकारे यांनी अंगणवाडी अधीक्षकांची चांगलीच खरडपट्टी काढत अंगणवाडीला सील करण्यात आले. तालुका पोषण आहार अधीक्षकांनी कुलूप लावत व रजिस्टर ताब्यात घेतले.

पुन्हा पल्लवी सावकारे यांनी बालविकास प्रकल्प अधिकारी श्री.गायकवाड यांच्यासमवेत गावात जावून पंचनामा केला. यावेळी रजिस्टर तपासले असता, जवळपास ४६ लाभार्थ्यांच्या बोगस सह्या घेऊन मालाचे वाटप दाखविण्यात आले.

अंगणवाडीत गोदाम तपासणी केली असता, त्यात तांदळाचा पूर्ण साठा तसाच पडून असल्याचे दिसून आले. या रजिस्टरवर गावातून कामानिमित्त बाहेर गेलेेल्या लोकांच्या बोगस सह्या करण्यात आल्याचे यावरुन उघडकीस आले आहे. प्रसंगी अंगणवाडी निरीक्षक उज्वला पाटील, सरपंच निता जाधव, उपसरपंच कैलास पाटील, पोलिस पाटील अतुल पाटील आदींच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला.

शिंदी, ता.भुसावळ येथील दोन अंगणवाडीत लाभार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. यात प्रत्येकी १ किलो साखरेसह तांदूळ, मसूर दाळ, गहू, हरभरा, हळद, तिखट, मीठ आदी एकूण ९ किलो आहार दर महिन्याला दिला जातो. या अंगणवाड्यांमध्ये १०४ लाभार्थी आहेत.

मात्र, या महिन्यात गोरगरीब लाभार्थ्यांना दिला जाणारा खाऊच्या बोगस सह्या करुन, तो वाटप झाल्याचे दाखविले. मात्र प्रत्यक्ष पाहणी केली असता, हा साठा अंगणवाडीत आढळून आला. यात एका अंगणवाडीत २५ तर दुसर्‍या अंगणवाडीत ४२ लाभार्थ्यांचा साठा आढळून आला. हा सर्व साठा बोगस सह्या करुन परस्पर लंपास करण्याचा प्रयत्न होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com