वाढदिवसाच्या दिवशीच युवकाचा निर्घृण खुन

संशयित ताब्यात : आरोपी एकपेक्षा अधिक असल्याचा संशय
वाढदिवसाच्या दिवशीच युवकाचा निर्घृण खुन

भुसावळ - Bhusawal - प्रतिनिधी :

येथील जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदिरासमोर 30 वर्षिय युवकाचा निर्घुण खुन केल्याची घटना 16 रोजी पहाटे उघडकीस आली आहे. वाढदिवसाच्या पार्टीत वाद होत मित्रानेच डोक्यात फावडे मारुन खुन केल्याचे निष्पन्न झाले असून संशयित हद्दपार आरोपीला अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सचिन ज्ञानदेव भगत (वय 30, रा. श्रद्धा नगर) असे मयताचे नाव असून दि. 15 रोजी त्याचा वाढदिवस होता. त्या निमित्ताने तो रात्री मित्रांसह पार्टीत गेला होता. दरम्यान, दारुच्या नशेत मित्रासोबत वाद झाल्याने संशयित हद्दपार आरोपी प्रशांत उर्फ मुन्ना चौधरी याने डोक्यात फावडा मारुन निर्घुण खुन केला.

मॉर्निंगवॉकला जाणार्‍यांना दिसला मृतदेह - दरम्यान, 16 रोजी पहाटे जामनेर रोडवरील गजानन महाराज मंदीर परिसरात नेहमीप्रमाणे मॉर्निंगवॉकला जाणार्‍या नागरिकांना सदरचा मृतदेह दिसून आला. त्यानंतर नागरिकांनी बाजारपेठ पोलिसात याबाबत माहिती दिली.

घटनेची माही मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, पो.नि. दिलीप भागवत, पो.नि. बाबासाहेब ठोंबे, पो.नि. रामकृष्ण कुंभार, सपोनि अनिल मोरे यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.

पत्नीने ओळखला मृतदेह

दरम्यान, सुरुवातीला मृतदेह हा अनोळखी म्हणून आढळून आला. मयताच्या चेहर्‍यावर गंभीर जखमा असल्याने ओळख पटविण्याचे आव्हाण पोलिसांसमोर होते. पोलिसांनी तपास चक्रे फिरवित मयताचे नाव निष्पन्न केले.

खात्रीसाठी मयताची पत्नी सपना सचिन भगत हिस बोलविण्यात आले. तिने मृतदेह पती सचिन याचा असल्याचे सांगितल्याने मयताची ओळख पटली. दरम्यान या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात पत्नी सपना सचिन भगत यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आरोपीला अटक

खुनाची घटना उघडकीस येताच पोलिसांनी तपासचक्रे फिरवत काही जणांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशी दरम्यान, सदरचा खुन प्रशांत उर्फ मुन्ना चौधरी याने केल्याची माहिती मिळाली त्यानंतर पथकाने तात्काळ शोध घेत मुन्ना चौधरी यास ताब्यात घेतले व पोलिसी खाक्या दाखवताच खुनाची कबुली दिल्याने त्याला अटक करण्यात आली.

सदरच्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेत युवकाचा खुन अन्य ठिकाणी झाला असण्याची व तेथून त्याचा मृतदेह त्याच्या घराच्या परिसरात आणून टाकला असल्याची शक्यता आहे.

त्यामुळे या गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपीसह अन्य आरोपींचा समवेश असण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने पोलिस तापस करत असल्याचे समजते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com