भुसावळ : वारीची २०० वर्षांची परंपरा खंडित

करोनाच्या पार्श्‍वभुमीवर कार्यक्रम रद्द : अभिषेक व आरती होणार
भुसावळ : वारीची २०० वर्षांची परंपरा खंडित

भुसावळ (आशिष पाटील) Bhusawal :

येथील विठ्ठल मंदीर (vitthal mandir) वार्डातील विठ्ठल मंदीर हे परिसरातील वारकरी व भाविकांचे श्रद्धास्थान मानले जाते.

मंदीराची इमारत ८५ वर्ष जुनी असली तरी मंदीराच्या याच जागेवरुन २०० वर्षांपासून झेंडा रोवून परिसरातील दिंड्या पंढरपूरच्याा (Pandharpur) दिशेने रवाना होतात.

मात्र मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर आषाढी एकादशी निमित्ताने आयोजित होणारे कार्यक्रम रद्द करण्यात आल्यामुळे वारकर्‍यांच्या वारीत २०० वर्षात दुसर्‍यांदा खंड पडला आहे.

शहरातील सध्याच्या विठ्ठल मंदीर वार्डातील विठ्ठल मंदीराच्या २०० वर्षापूर्वीच्या मोकळ्या जागेवर खान्देशातील वारकरी व दिंड्या जमा होत होत्या. याच ठिकाणी झेंडा रोवून दिंडी पुढे रवाना होत होत्या. कालांतराने या जागेचे महत्व वाढत गेले.

साधारण ८५ वर्षांपूर्वी शहरातील लेवा पाटीदार समाजाचे एकनाथ फालक, आत्माराम फालक यांच्यासह वारकरी परंपरेतील सद्गुरु झेंडुजी महाराज बेळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विठ्ठल मंदीराची स्थापना करण्यात आली.

त्या काळात परिसरातील हे पहिले व खान्देशातील प्रमुख विठ्ठल मंदीर असल्याचे सांगण्यात येत दरवर्षी येथिल विठ्ठल मंदीरातून पंढरपुरात दिंडी रवाना होते. मात्र कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर दिंडीच्या परंपरेत खंड पडला आहे.

कार्यक्रम रद्द

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्‍वभुमीवर मंदीरातर्फे आयोजित करण्यात येणारे विविध कार्यक्रम रद्द करण्यात आले आहे.या निमित्ताने २१ रोजी मंदीरात सकाळी ६ ते ६.३० वाजता अभिषेक होणार आहे.

यावेळी मंदीराचे पुजारी विजय पाटील निवडक भाविक पदाधिकारी उपस्थित असतील. तर सायंकाळी ७ वाजता मान्यवांच्या हस्ते आरती होणार आहे.

यावेळी बेळीकर महाराज संस्थानचे ७ वे वारस हभप भरत महाराज बेळीकर यांचे भजन व किर्तण होणार आहे. २२ रोजी सकाळी १० वाजता त्यांचेच काल्याचे कीर्तण होणार आहे. भाविकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन मंदीरातर्फे करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com