जामनेर - Jamner - प्रतिनिधी :

संपूर्ण राज्यभर गाजत असलेल्या बी.एच.आर पतसंस्थेतील झालेल्या गैरव्यवहाराची जंत्रीच माझ्याकडे असून माजी मंत्री आ. गिरीश महाजन व त्यांच्या पत्नी साधना महाजन यांनी जामनेर शिवारातील बोदवड रोड व शहापूर रोडवरील सुमारे 25 कोटी रुपयांची जमीन कवडीमोल भावात घेऊन ठेवीदारांची मोठी फसवणूक केली आहे; असा आरोप माजी नगराध्यक्ष पारस ललवाणी यांनी जामनेर येथे त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.

पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेने पारस ललवाणी यांना पतसंस्थेतील गैरव्यवहारप्रकरणी चौकशीसाठी बोलविले होते.

जामनेर शहरात मात्र पारस ललवाणी यांच्या अटकेच्या अफवेपासून उलट-सुलट चर्चा सुरू होती. आज ललवाणी जामनेर येथे दाखल झाले असता त्यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना ते म्हणाले की, बीएचआर पतसंस्थेसंबंधी माझ्याकडे बरेच पुरावे आहेत.

माजी मंत्री व त्यांच्या हस्तकांनी काय काय पराक्रम केले; हे मला माहीत आहे. ही सर्व माहिती मी पुणे येथील आर्थिक गुन्हे शाखेकडे दिली असून जामनेर शहरातील 20 ते 25 कोटी रुपयांची जमीन फक्त एक ते सव्वा कोटी रुपयात आ. महाजन यांनी घेतली. हे पैसेही रोख न भरता पावत्या जमा केल्या.

शहरातील त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांच्या नावावरही त्यांनी बीएचआरच्या अनेक जमिनी मातीमोल भावात विकत घेतल्या आहेत.

पुणे येथील ढोले पाटील रोडवरील सव्वाशे कोटी रुपयांची जमीन त्यांचा हस्तक असलेला जवळचा कार्यकर्ता सुनील झवर यांच्या नावे कवडीमोल भावात विकत घेतल्याचे सांगून सुनील झवर हा कुणाचा कार्यकर्ता आहे, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

ते पुढे म्हणाले की, आज शंभर ते सव्वाशे कोटी रुपयात किती लोकांच्या ठेवी परत मिळाल्या असत्या? किती लोकांच्या आत्महत्या थांबू शकल्या असत्या. हेच लोक आत्महत्या करायला भाग पाडत आहे, असा आरोपही त्यांनी केला.

ही कशा पद्धतीने जनतेची फसवणूक करता, याचे उदाहरण आहे. आ. महाजन धुतल्या तांदळासारखे आहेत तर ते आज रिंगण सोडून पळ का काढत आहेत. त्यांचे अनेक कार्यकर्ते आज भूमिगत आहेत.

जर त्यांनी अपहार केला नाही तर भूमिगत होण्याचे कारण काय? असा प्रश्न उपस्थित करून ते शेवटी म्हणाले की, या सर्व प्रकरणाची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.