कंडारेंना कुराडेंची साथ

सहकारसोबत पोलीस विभागही गोत्यात : सरकारी वकिलांचा न्यायालयात युक्तीवाद
कंडारेंना कुराडेंची साथ

जळगाव - Jalgaon :

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या बीएचआर पतसंस्थेतील अपहाराचा मुद्दा चांगलाच गाजत असून यात अनेकांचे धाबे दणाणलेले असतांना आता जळगाव आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन निरीक्षक व सध्या धुळे येथे कार्यरत असलेले लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनील कुराडे यांचे नाव समोर येत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

जळगाव न्यायालयात सुरु असलेल्या खटल्यात सरकारी वकीलांनीच कुराडेंच्या कुरापतींचा उल्लेख केल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता असून सहकार विभागासोबतच पोलीस विभागातील बड्या अधिकार्‍यांचा बीएचआर घोटाळ्यात हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.

जळगाव येथे कार्यरत असतांना आर्थिक गुन्हे शाखेचे तत्कालीन अधिकारी सुनील कुराडे यांनी बीएचआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांच्या माध्यमातून फॉरेन्सिक ऑडिटसाठी या घोटाळ्यात संशयित असलेल्या महावीर जैन याला साडेसहा लाख रुपये का द्यायला लावले यासह अनेक गंभीर मुद्यावर चौकशी सुरू असल्याचा युक्तिवाद सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी मंगळवारी न्यायालयासमोर केला.

तसेच बीएचआर घोटाळ्यात अटकेतील संशयितांच्या जामिनावर जोरदार आक्षेप घेतला. त्यांच्या युक्तीवादामुळे बीएचआर घोटाळ्यात संशयित कंडारेसोबत सुनील कुराडे यांचे नाव समोर आल्याने कुराडे चांगलेच गोत्यात येण्याची शक्यता आहे.

महावीर जैन याने वेळोवेळी कंडारेला मदत केली

बीएचआर घोटाळ्यातील संशयितांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर पुणे न्यायालयात कामकाज सुरु आहे. यात संशयित महावीर जैन यांच्या जामीन अर्जावर आज सलग दुसर्‍या दिवशी सुनावणी झाली.

महावीर जैन यांचा बीएचआर घोटाळ्यात कशा पद्धतीने महत्वाचा सहभाग होता, जैन यांनी समान न्याय तत्त्वाचा वापर न करता वेळोवेळी अवसायक कंडारेला मदत केली आहे, तर त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.

जैन यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर केला, असे मुद्दे मांडून अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी जैन यांच्या जामीन अर्जावर जोरदार आक्षेप घेतला.

संशयित कंडारेशी निरीक्षक कुराडेंचे संबंध

महावीर जैन यांच्या कार्यालयातून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाला जळगाव एमआयडीसीच्या काही फाईल्स मिळाल्या आहेत. त्या नेमक्या कशाशी संबंधित आहेत? तसेच तत्कालीन आर्थिक गुन्हे शाखेचे अधिकारी सुनील कुराडे यांनी ज्या कंडारेविरुद्ध तक्रार केली होती, त्याच अवसायक कंडारेला फॉरेन्सिक ऑडिटची साडेसहा लाख रुपये फी महावीर जैनला का द्यायला लावली? असा प्रश्नही अ‍ॅड. चव्हाण यांनी न्यायालयासमोर उपस्थित केला.

कंडारेचीच कशी बीएचआरमध्ये नियुक्ती ?

अगदी कंडारेची नियुक्ती बीएचआरमध्ये कशी झाली? ही बाबदेखील अ‍ॅड. चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली तर दुसरीकडे बुधवारी बचाव पक्ष आपले म्हणणे सादर करण्याची शक्यता आहे.

त्यानंतर न्यायालय आपला निर्णय देईल. दरम्यान, सुजित बाविस्कर (वाणी) च्या जामीन अर्जाच्या निकालावर कामकाज होण्याची शक्यता आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com