जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्था अथार्र्त बीएचआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे याने सुद्धा संचालक मंडळाप्रमाणे ठेवीदारांचा विश्वासघात करुन त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले.

राज्यभरातून ठेवीदाराचा उद्रेक झाल्यानंतर पहिली तक्रार पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षका रंजना नारखेडे यांनी पुणे पोलिसांकडे केली.

त्यानंतर पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने जळगावात छापा मारुन अवसायकासह बड्या मंडळींना हादरा दिला.

या छाप्यानंतर गेल्या 21 दिवसांपासून अवसायक कंडारे, उद्योजक सुनील झंवर यासह इतर आरोपी फरार असून आर्थिक गुन्हे शाखेला अवसायक जितेंद्र कंडारे,उद्योजक सुनील झंवर हे पोलिसांच्या यादीवर मोस्ट वॉन्टेड आहेत.

बीएचआर पतसंस्थेचे संस्थापक संशयित आरोपी प्रमोद रायसोनी उर्फ अंकल याच्यासह संचालकांना अटक करुन त्यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

त्यानंतर बीएचआर पतसंस्थेवर जितेंद्र कंडारे याची अवसायक म्हणून नियुक्ती झाली. आता जळगावसह राज्यभरातील ठेवीदारांना हक्काच्या ठेवी मिळतील, अशी आशा लागून असताना अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील झंवर, सीए महावीर जैन,धरम सांखला, विवेक ठाकरे यासह मातब्बर दलालांच्या टोळीने बीएचआर पतसंस्थेचे लचके तोडण्यास सुरुवात केली.

ठेवीदारांच्या मूळ पावत्या गोळा करुन या टोळीने करोडोची आर्थिक माया गोळा केल्यानंतर त्यांच्या पापाचा घडा अखेर भरला आणि दि.29 नोव्हेंबरचा दिवस या लुटारुंच्या टोळीसाठी काळवैर्याची ठरली.

विवेक ठाकरे, धरम सांखला, महावीर जैनसह पाच जणांना अटक करण्यात आली असून ते न्यायालयीन कोठडीत आहेत. तर अवसायक कंडारे, उद्योजक सुनील झंवर यासह इतर आरोपी गेल्या 21 दिवसांपासून फरार असून पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या यादीवर मोस्ट वॉन्टेड म्हणून या आरोपींचा समावेश आहे.

मात्र, या संशयित आरोपींना पकडण्याचे आव्हान पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकासमोर उभे ठाकले आहे.

नवीन अवसायक नियुक्तीसाठी ठेवीदार बांधणार मोट

नाशिक, नागपूर, मालेगाव, उस्मानाबाद, पुणे, लातूर, परभणी, सांगली यासह राज्यभरातील ठेवीदारांची मोट बांधली जात आहे.

अवसायक कंडारे फरार असल्याने त्याचा पोलिसांनी शोध घेवून अटक करावी, बीएचआर पतसंस्थेचा कारभार सुरळीत होण्यासाठी नवीन अवसायक यांची नियुक्ती करावी, यासह इतर विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजन समितीचे अध्यक्ष उमेश मुंदडा नाशिक यांनी दि. 20 डिसेंबर रोजी दुपारी 4.30 वाजता झुम मीटिंगचे आयोजन केले आहे.

सर्व ग्रुपमधील ठेवीदारांनी या मीटिंगमध्ये सहभागी होऊन समितीस सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे अशोक मंडोरे, गिरधर डाभी यांनी केले आहे.