जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्था अथार्र्त बीएचआर पतसंस्थेत जळगाव, मालेगाव, उस्मानाबाद, जालना, पुणे यासह राज्यभरातील विविध जिल्ह्यातील ठेवीदारांनी कष्टाचा पैसा ठेव म्हणून ठेवली.

मात्र, ठेवीची मुदत पूर्ण होऊन हक्काचा पैसा मिळाला नाही. तर काहींनी अवसायक जितेंद्र कंडारे याच्याकडे मूळ ठेवीच्या पावत्या जमा केल्या. परंतु, त्यांच्याकडूनही आश्वासनाचे गाजर मिळाले.

शेवटी पदरी निराशा आल्याने कोणी वडिलांना गमावले तर काहींना वैद्यकीय उपचारासाठी पैसा नसल्याने त्यांनी मृत्यूला कवटाळले. उस्मानाबाद येथील 58 वर्षीय ठेवीदाराचा मृत्यू झाला. तर मालेगाव येथील 52 वर्षीय गुरुजीचे उपचराअभावी निधन झाले.

उपचारासाठी पैसे वेळेवर मिळाले असते तर या ठेवीदारांचा मृत्यू टळला असता या ठेवीदारांच्या मृत्यूला अवसायक कंडारे हेच जबाबदार आहेत, असा सूर ठेवीदारांमधून उमटत आहे. महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीकडून दोन ठेवीदार व्यक्तींचा बळी गेल्याचे दु:ख व्यक्त करुन व्हॉटस्अप गृपवर त्या मृत ठेवीदारांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बीएचआर पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन प्रमोद रायसोनी याच्यासह संचालक मंडळाने जवळच्या नातेवाईकांना 135 कोटींच्यावर कर्ज वाटप केले होते. तसेच इतरांना बेसुमार कर्ज वाटप करुनही वसुलीचा टाळमेळ चुकला.

तसेच संचालक मंडळाच्या हलगर्जीपणामुळे बीएचआर पतसंस्था दिवाळखोरीत निघाली. सन 2015 मध्ये अवसायक जितेंद्र कंडारे यांची नियुक्ती झाल्यानंतर महाराष्ट्रभरातील ठेवीदारांना लवकरच ठेवी मिळण्याची आस लागू होती.

महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून अवसायक जितेंद्र कंडारे यांच्याकडे पाठपुरावा सुरु होता. याच दरम्यान, मालेगाव, उस्मानाबादसह इतर जिल्ह्यातील काही ठेवीदार बीएचआर पतसंस्थेची मुख्य शाखा जळगावात असल्याने अवसायक जितेंद्र कंडारे याची भेट घेतली.

मात्र, ठेवी मिळण्याऐवजी बीएचआर पतसंस्थेच्या कार्यालयात चकरा मारण्यात अनेक ठेवीदारांच्या चपला घासल्या गेल्याची व्यथा ठेवीदार कथन करीत आहेत. तसेच उस्मानाबाद येथील मेडिकल स्टोअर्स व्यवसायिक नंदकिशोर द्वारकादास चांडक (वय 58 ) यांनी 22 लाखांच्या ठेवी ठेवल्या होत्या.

दोन महिन्यांपूर्वी त्यांचे वडील द्वारकादास चांडक (वय 85) यांचे निधन झाले. चांडक यांनी अवसायक जितेंद्र कंडारे यांची भेट घेऊन चार वर्षांपासून जवळ ठेवलेल्या पावत्या त्यांनी दिल्या. मात्र, त्यांना तोडकेमोडके पैसे दिले.

त्यानंतर अवसायक कंडारे याने हात वर केले होते. वडिलांच्या निधनानंतर दोनच महिन्यात वैद्यकीय उपचारासाठी पैसे नसल्याने नंदकिशोर चांडक यांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. दरम्यान,मालेगाव येथील महात्मा गांधी विद्या मंदिरातील शिक्षक भगवान दगडूदास बैरागी (वय 68) यांनी सेवानिवृत्तीनंतर 30 लाख रुपयांची ठेव ठेवली होती.

मुदत पूर्ण होऊनही त्यांना पैसे मिळाले नाही. त्यांनाही बीएआर पतसंस्थेचे अवसायक जितेंद्र कंडारे यांनी मूळ पावत्या मागितल्या होत्या. मात्र, महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष अशोक मंडोरे यांनी मूळ पावत्या कोणालाच देवू नका, असा सल्ला दिला होता.

त्यांच्या पावत्या सुरक्षित आहेत. मात्र, बैरागी गुरुजी यांचेही मंगळवारी हॉर्डअॅटकमुळे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या मृत ठेवीदारांना महाराष्ट्र राज्य ठेवीदार संघर्ष समितीकडून गु्रपवर श्रध्दांजली वाहून अवसायक कंडारेविषयी ठेवीदारांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.