जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्था अथार्र्त बीएचआर पतसंस्थेत आर्थिक घोटाळाप्रकरणी मुख्य संशयित आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, योगेश सांखला,अविनाश सोनी,सतीश ठाकरे हे अद्यापी फरार असून ,

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जप्त केलेल्या फाईलींसह कागदपत्रांची तपासणीवरुन या आरोपींच्या आर्थिक गुन्ह्याची कुंडली तयार करण्याचे काम सुरु असल्याची माहिती समोर येत आहे.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटक्के यांच्या नेतृत्वाखाली सात पथकांची विभागणी करुन पथकाने नियोजनबद्धरीत्या दि.29 नोव्हेंबर रोजी सकाळी 6 वाजेच्या सुमारास जळगावात 135 जणांच्या पथकाने एकाच वेळी बीएचआरचे अवसायक जितेंद्र कंडारे, उद्योजक सुनील कंडारे, सीए महावीर जैन, धरम सांखला, ठेवीदार संघटनेचे अध्यक्ष विवेक ठाकरे, सुजीत वाणी आदींच्या घरी आणि कार्यालयावर छापा मारण्यात आला होता.

त्याच दिवशी रात्री कार्यालय सील करुन प्रत्येकाच्या ऑफीसच्या कार्यालयासमोर पोलीस बंदोबस्त तैनात करुन या पथकाकडून झाडाझडती करण्यात आली होती.

सलग तीन दिवस तपासणी करुन एक ट्रकभर महत्वाचे कॉप्प्युटर, हार्डडिस्क, पेन ड्रॉईव्ह, सीडी याच्यासह कागदपत्रांच्या फाईली, स्टॉपपेपर, ठेवीदारांच्या पावत्या आदी साहित्य जप्त करुन पुण्यातील आर्थिक गुन्हे शाखेत एक-एक कागदपत्रांची तपासणी करुन कोणी-कोणी किती आर्थिक घोटाळा केला आहे,अशी आरोपींनिहाय कुंडली तयार करण्याचे काम सुरु आहे. तर चार पथके फरार आरोपींच्या शोधार्थ रवाना करण्यात आलेले आहेत.

सात पथकांकडून कागदपत्रांची तपासणी

जळगावातून ट्रकभर कागदपत्रांसह फाईली घेऊन गेले असल्याने तपासणी करण्यासाठी वेळ लागत असून प्रत्येक फाईलीतील कागदाची तपासणी करुन नोटस काढण्यात येत आहे.

तर दुसरे पथक संगणक तज्ज्ञाच्या मदतीने हार्डडिस्क, पेन ड्रॉईव्ह, सीडी आदींची संपूर्ण तपासणी केली जात असून यासंपूर्ण तपासासाठी एक ते दीड महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. दरम्यान, फरार आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, योगेश सांखला,अविनाश सोनी, सतीश ठाकरे आदी संशयित आरोपीच्या शोधार्थ चार पथके रवाना करण्यात आलेले आहेत.

या आरोपींच्या घरांवरही वॉच करण्यात येत असून नातेवाईक आणि जळगाव, नाशिक,मुंबई,पुणे यासह विविध शहरातील आलीशान हॉटेलसुद्धावर पथकाची नजर असल्याची माहिती समोर आली आहे.

सुनील झंवर-जितेंद्र कंडारेचा मोबाईल स्विचऑप

बीएचआर पतसंस्थेेच्या आर्थिक घोटाळाप्रकरणी मुख्य सूत्रधार उद्योजक सुनील झंवर आणि अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांचे मोबाईल लोकेशन आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासाधिकार्यांनी घेतले असता ,

त्यांचा मोबाईल स्विचऑप करुन ठेवल्याचे समोर येत आहे. दरम्यान, बीएचआर पतसंस्थेेच्या घोटाळ्याच्या तपासात या दोघांना अटक करणे महत्वाचे आहे.

त्यानंतर या घोटाळ्यातील मास्टर माईंडपर्यंत पोहोचण्याचा मार्ग सोपा होणार आहे. तसेच काही बड्या राजकीय मंडळींचा सुद्धा या गुन्हयात धागेदोरे गवसण्याची शक्यता वर्तविली जात आहे.