जळगाव - Jalgaon :

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेच्या गैरव्यवहारप्रकरणी संशयित आरोपी सुनील झंवर यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांतून इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, गंगापूर, नाशिकमधील विविध कामांच्या ठेक्यांसह अनेक ठिकणी गुंतवणूक केली आहे का ?

या दृष्टिकोनातून तपासचके्र फिरत असून नाशिकमधील गुंतवणूक आर्थिक गुन्हे शाखेतील पथकाच्या रडारवर आली आहेत. बीएचआर पतसंस्था घोटाळ्याचा पैसा सुनील झंवर यांनी बोरा नामक व्यक्तीच्या माध्यमातून नाशिकसह राज्यातील अन्य शहरांमध्ये गुंतवणूक केल्याचा संशय पोलिसांना असून लवकरच पथकाकडून नाशिक महापालिकेतील साडेतीन वर्षातील कंत्राटांची तपासणी होणार असल्याचे संकेत आहेत.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टिस्टेट पतसंस्थेत (बीएचआर) गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर उद्योजक सुनील झंवर यांच्या रमेश ड्रायव्हिंग स्कूलसह अन्य कार्यालयात मिळालेल्या कामगारांच्या एटीएम कार्डसह अन्य काही कागदपत्रे सापडली होती.

या कागदपत्रांचा संबंध नाशिक महापालिकेतील वादग्रस्त सफाई कर्मचारी ठेक्यासोबत संबंध असल्याचा यंत्रणेला संशय आहे.

एवढेच नव्हे तर शालेय पोषण आहार, आऊट सोर्सिंगद्वारे शहर स्वच्छता स्मार्ट सिटीमार्फत सुरु असलेले प्रोजेक्ट, गोदावरी नदीवर सुरु असलेले पुलाचे काम तसेच समृद्धी महामार्गाच्या कामासाठी बोरा नामक व्यक्तीने पुरविलेले डंपर, जेसीबी अशा विविध कामांशी काही संबंध आहे का?

याची चौकशी करण्यासाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक नाशिकमध्ये धडकण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

त्यामुळे पुण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशीचा आपला मोर्चा नाशिक शहराच्या दिशेने वळविल्याची चर्चा आहे. दरम्यान, सुनील झंवर यांनी राज्यभरात कुठे-कुठे गुंतवणूक केली आहे. तसेच ही गुंतवणूक बीएचआर घोटाळ्याच्या पैशातून झाली आहे का?

याची प्रामुख्याने चौकशी होणार असून नाशिकमधील धान्य व्यापारी व महापालिकेतील ठेकेदार बोरा या दोघांच्या माध्यमातून नाशिकमध्ये औद्योेगिक वसाहतीबरोबरच इगतपुरी, घोटी, त्र्यंबकेश्वर, गंगापूर, दरी, मातोरी आदी भागात अनेक मोठ्या फार्म हाऊसचे व्यवहार झाल्याच्या तक्रारी तपास यंत्रणेला मिळाल्याची चर्चा आहे.

बेनामी संपत्तीच्या दिशेने तपासचक्रे

बीएचआर पतसंस्था घोटाळ्याचे धागेदोरे नाशिक येथील वॉटर ग्रेसचा ठेका, मांजरपाडा आणि समृद्ध योजनेतील वाहन पुरवठ्याचा ठेक्याच्या दिशेने जात असल्याची चर्चा सुरू आहे. तसेच नाशिकमधील सातपूर, अंबडमध्ये अनेक बेनामी संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे आर्थिक गुन्हे शाखेने आपल्या तपासाची चक्रे आता नाशिकच्या दिशेने वळविण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पोलीस चौकशीत सत्य बाहेर येईलच! - आ.गिरीश महाजन

मुंबई । राज्यात भाजपा नेत्यांना अडचणीत आणण्याच्या खेळी सुरू झाल्या असून बीएचआर पतसंस्थेतील कथीत घोटाळ्याशी आपला दुरान्वयेही संबंध नाही.

सुनील झंवर हे माझे मित्र असल्याने व या चौकशीत त्यांचे नाव आल्याने केवळ राजकीय द्वेषापोटी षडयंत्र रचून या प्रकरणात माझे नाव गोवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.

परंतु, या सार्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून लवकरच सत्य बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया आ.गिरीश महाजन यांनी मुंबईत प्रसार माध्यमांशी बोलतांना दिली.

धुळे, नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अमरिश पटेल विजयी झाल्यानंतर एका वृत्तवाहिनीशी बोलतांना त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.