बीएचआर पतसंस्था घोटाळा : कटकारस्थानात ‘बाप से बेटा सवाई’

कोट्यवधींच्या मालमत्ता खरेदीत पित्यासोबत मिळून केला झोल
बीएचआर पतसंस्था घोटाळा : कटकारस्थानात ‘बाप से बेटा सवाई’

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्यात टेंडर दुसर्‍याच नावे भरुन स्वतः मालमत्ता खरेदी, बीएचआरची कर्जाची तडतोड करणे यासह सर्व कट कारस्थानांमध्ये फरार असलेल्या सुनील झंवर इतकाच त्याचा मुलगा संशयित सूरज झंवर याचा सहभाग असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

विशेष म्हणजे बनावट सॉफ्टवेअरद्वारे टेंडर भरणे, स्वतः हस्ताक्षरात भरलेले टेंडर फार्म यामुळे या घोटाळ्यात संशयित सुनील झंवरपेक्षा सूरज हा बाप से बेटा सवाई असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

बीएचआरची पुण्यासह जळगावातील मालमत्ता खरेदी करुन काळेबेरे करुन पारदर्शक व्यवहार असल्याचे भासविले.

मात्र पुणे आर्थिक गुन्हे शाखेने या गैरकारभाराचा बुरखा टराटरा फाडला आहे. आता सुरज झंवरला अटक केल्यावर ज्याच्या नावे मालमत्ता खरेदीसाठी टेंडर भरण्यात आले. ते संबंधितही आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे.

मालमत्ता खरेदी करणार्‍या साई मार्केटींगमध्ये सूरज भागीदार

बीएचआर घोटाळ्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने फरार असलेल्या मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सूरज झंवर यास जळगावातून अटक केली. त्याला 2 फेब्रुवारीपर्यंत 11 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुनील झंवर यांची साई मार्केटींग अ‍ॅण्ड ट्रेडींग नावाने कंपनी आहे. या कंपनीत सूरज झंवर हा संचालक असून तो कंपनीचा भागीदार आहे. या कंपनीच्या नावाने निविदा भरुन बीएचआरच्या कोट्यवधींच्या मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी केल्याचे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात निष्पन्न झाले आहे.

बीएचआर घोटाळ्यातील सर्व कटकारस्थानात ‘सूरज’ सहभागी

साई मार्केटींग या कंपनीचा सुरज झंवर हा संचालक आहे. मालमत्ता खरेदीसह इतर सर्व कटकारस्थान हे साई मार्केटींग अ‍ॅण्ड टे्रडींगचे खान्देश कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या कार्यालयात कट कारस्थाान रचण्यात आले. मालमत्ता खरेदीसाठी जे टेंडर भरण्यात आले ते सूरज झंवर याने त्याच्या लॅपटॉपवरुनच या निविदा भरल्या असल्याचेही तपासात समोर आले आहे.

साई मार्केटींग या कंपनीच्या नावाने पुण्यातील बीएचआर पतसंस्थेचे कोहीनूर बल्क अ‍ॅण्ड लॅन्ड नं 2, निगडी ता हवेली येथील चार दुकाने अशी 7 कोटींची मालमत्ता 2 कोटी 11 लाख 11 हजार 111 रुपयांत खरेदी करुन अपहार केला.

पुण्यातील घोले रोड येथील आठ कोटी रुपये किमतीचे चार गाळे तीन कोटी 11 लाख 33 हजार 111 रुपयात खरेदी करुन अपहार करण्यात आला. या दोन्ही मालमत्ता खरेदी करुन ठेवीदारांच्या मुदत ठेवींच्या पावत्या विकत घेवून वर्ग करण्यात आल्या.

नशिराबाद येथील तीन दुकानेही अशाच पध्दतीने खरेदी करुन अपहार करण्यात आला. ही सर्व दुकाने खरेदी करतांना साई मार्केटींगच्या नावाने निविदा भरण्यात येवून हा अपहार करण्यात आला.

याबरोबरच खान्देश कॉम्पलेक्समधील कार्यालयात गुन्हयातील आरोपींसोबत झालेल्या बैठका, तसेच बीएचआरची कर्जाची तडतोडही प्रकरणेही सुरज झंवर याच्यासमोर झाली असल्याचेही तपासात समोर आले आहे.

सूरजने ज्यांच्या नावे निविदा भरल्या, ते पथकाच्या रडारवर

साई मार्केटींगच्या नावाने काही मालमत्ता खरेदी केल्या. तर काही मालमत्ता खरेदी करतांना झंवर बाप बेट्याने त्यांचे दूरचे नातेवाईकांसह कार्यालयातील कर्मचारी व इतरांच्या नावे निविदा भरल्या. प्रत्यक्षात या मालमत्ता झंवरनेच खरेदी केल्या.

इतरांच्या नावाने टेंडर फार्म भरतांना ते सुरज झंवर याने स्वतःच्या हस्तारक्षरात भरले असल्याचेही समोर आले आहे. विशेष म्हणजे बीएचआरची कोट्यवधींची मालमत्ता कवडीमोल भावात खरेदी करण्याच्या या गोरखधंद्यात झंवरने ज्यांच्या नावे मालमत्ता खरेदी करण्यासाठी निविदा भरल्या त्या संबंधितांही नाव वापरल्याच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर पैसे मोजून घेतले.

या संबंधितांच्या खात्यावर साई मार्केटींगच्या बँकेच्या खात्यावरुन पैसे वर्ग करण्यात आल्याचे तपासात समोर आले आल्याचे सूत्रांनी सांगितले.

त्यामुळे सूरज झंवर यानेही स्वतःच्या हस्तारक्षरात कुणा कुणाच्या नावाने टेंडर फार्म भरले, त्यांची नावे तसेच माहिती पोलीस कोठडीत सूरज झंवर याच्याकडून समोर येण्याची शक्यता आहेत. नावे समोर आल्यानंतर संबंधितांनाही अटक होण्याची शक्यता असल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. दरम्यान, कुणाल शहाने मालमत्ता खरेदीसाठी बनविलेले स्वॉफ्टवेअर झंवरच्या कार्यालयातही इन्स्टॉल केले होते व त्याव्दारे सूरज झंवर हा मालमत्ता खरेदीसाठी टेंडर भरत असल्याचेही पुणे आर्थिक गुन्हे शाखेने झंवरच्या कार्यालयातून जप्त केलेल्या तांत्रिक तसेच कागदोपत्री पुराव्यांवरुन समोर आले आहे.

त्यामुळे सूरज झंवरकडून पोलीस कोठडीतून यातील अनेक गैरव्यवहाराची माहिती समोर येण्याची दाट वर्तविली जात आहे तर दुसरीकडे मुलाला अटक होवून कोठडी झाल्याने सुनील झंवर हा पोलिसांना शरण येण्याचीही चर्चा सर्वत्र सुरु आहे.

सूरज झंवरने बँकाच्या मॅनेजरांनाही धमकाविले

पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे बीएचआर घोटाळयात छापेमारी केल्यानंतर काही संशयितांना अटक केली. यात मुख्य संशयित सुनील झंवर फरार आहे. यात मोठ्या प्रमाणावर अपहार व त्यात सुनील झंवर हाच मास्टरमाईंड असल्याचे पुरावे संकलनानंतर तसेच तपासात समोर आले. त्यामुळे पुणे आर्थिक गुन्हे शाखेने संशयित सूरज झंवर यांच्यासह त्याच्या कुटुंबियांच्या बँक खात्याची माहिती मिळविण्यासाठी तसेच संबंधित बँकांमधील खाते गोठविण्यात यावी, यासाठी

जळगाव शहरासह नाशिक येथील विविध बँकांना पत्र दिली. यादरम्यान सूरज झंवरने जळगावसह नाशिक येथील बँकांच्या व्यवस्थापकांना धमकी देवून बँकाची खाते खुली ठेवण्यास सांगितल्याचे तपासात समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे याठिकाणी बाप से बेटा सवाई या म्हणीचा प्रत्यय आला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com