सुनिल झंवरच्या मुलास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

राजकीय पुढाणार्‍यांच्या छातीत धडकी; निविदा भरणार्‍यांसह खरेदी करणारेही रडारवर
सुनिल झंवरच्या मुलास आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून अटक

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी अटक केलेल्या संशयितांच्या कुटुंबियांचे जाबजवाब नोंदविल्यानंतर आज पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुनिल झंवरचा मुलगा सुरज झंवर याला पाळधी येथील राहत्या घरुन सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अटक करीत त्याला सोबत घेत पथक तात्काळ पुणे रवाना झाले. सुरज झंवरच्या अटकेमुळे जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे.

गुन्ह्याच्या तपासात सुरज झंवर याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच त्याला आज पाळधीतून अटक केली. त्याचा गुन्ह्यात नेमका सहभाग काय आहे हे आता सांगता येणार नाही.

भाग्यश्री नवटके, उपायुक्त आर्थीक गुन्हे शाखा पुणे

बीएचआर घोटाळा प्रकरणातील मुख्य संशयीत आरोपी सुुनील झंवर याने नाशिकमधील मांडसांगवी येथील 100 कोटीची जमीन केवळ 3 कोटी रुपयात घेतली होती.

याप्रकरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेत जिल्हाधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले होते.

त्यानंतर आता अपर महसूल सचिवांनी न्यायाधिकरणाने दिलेल्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांना आव्हान याचिका दाखल करण्याचे आदेश दिल्यामुळे झंवरच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

बीएचआरच्या घोटाळ्यात सुनील झंवर हा देखील बीएचआरप्रकरणात झालेल्या व्यवहारात मोठा सूत्रधार असल्याचे आता शिक्कामोर्तब झाले आहे.

सहभागाची खात्री झाल्यानंतरच केली अटक

पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात मुख्य सूत्रधार सुनील झंवर हा संशयित आरोपी आहे. या गुन्ह्याच्या चौकशीत सुनिल झंवरसह त्याच्या मुलाचा देखील सहभाग असल्याचे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या तपासात निष्पन्न झाल्यानंतरच सुरजला आज पथकाने अटक केली. या प्रकरणात सुरजचा सहभाग नेमका कोठे व कसा होता याबाबत न्यायालयात त्याला हजर केल्यानंतर समोर येईलच. परंतु सुरजला पथकाने अटक केल्यामुळे बड्या पदाधिकार्‍यांसह राजकीय गोटात मोठी खळबळ माजली आहे.

दोन दिवसांपासून सुरु होते जाब-जबाब

पुण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सुरुवातीला शहरात ठिकठिकाणी धाडी टाकत संशयितांना अटक केली होती. तेव्हापासून अवसायक जितेंद्र कंडारेसह मुख्य संशयीत आरोपी सुनिल झंवर फरार आहे. त्यानंतर दुसर्‍यांदा या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पथक दोन दिवसांपासून शहरात आहे. त्यांनी गुरुवारी शिवकॉलनीतील योगेश सांखलांच्या पत्नी व आईचा जबाब नोंदविला असून दोघांच्या जबाबासह योगेश सांखला व सुनील झंवर या दोघांचा शोध घेण्यासाठी हे पथक शहरात आले होते. परंतु मुख्य संशयित आरोपी सुनिल झंवर व योगेश सांखला हे दोघ पथकाला गवसले नाही. परंतु पथकाने आज सुरज झंवरला अटक करुन त्याला घेवून पुणे रवाना झाल्याचे समजते.

शरण येणार की अटक होणार ?

बीएचआर प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनिल झंवरच्या मुलास अटक झाल्यानंतर संपुर्ण राजकीय गोटात खबळ माजली आहे. सुरजच्या अटकेमुळे आता सुनिल झंवर हा पोलिसांना शरण येतो की पोलिस त्याला अटक करता याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. सुनिल झंवरला अटक झाल्यास यात बड्या राजकीय पुढार्‍यांची नावे देखील समोर येणार असल्याने सुनील झंवरला पथकाकडून अटक होते की नाही हे औत्सुकाचे ठरणार आहे.

अनेक फर्ममधून राज्यभरात पसरविले जाळे

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये मुख्य संशयित सुनील झंवर याच्या साई मार्केटिंग, युगर्शी ट्रेडर्स याप्रमाणे अनेक फर्म असूून त्याचे काम सुरज हा पाहत असतो. या फर्मच्या माध्यमातून राज्यभरात झंंवर यांनी जाळे परविले असून अनेक कामे ते पाहतात. त्यामुळे पुणे येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात सुनील झंवरसह मुलगा सुरजवर याचाही सहभाग असल्याचे खात्री झाल्यानंतरच पथकाने त्याला अटक केली. त्याच्या अटकेमुळे राजकीय पदाधिकार्‍यांनाही धडकी भरली असल्याची चर्चा सुरू आहेत.

आरोपींच्या संख्या वाढणार

बीएचआर प्रकरणात आतापर्यंत विवेक ठाकरे, महावीर जैन, सुजित वाणी, धर्म सांखला असे एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच बनावट वेबसाईट बनवणार्‍या संशयित कुणाल शहा यांचाही नुकताच जामीन अर्ज फेटाळण्यात आला असुन मुख्य संशयित जितेंद्र कंडारे व सुनील झंवर अद्याप फरार आहेत. बीएचआरची मालमत्ता खरेदीसाठी निविदा भरणार्‍यांसह ती खरेदी करणारेही पुण्यात गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. प्रत्येकाच्या गुन्ह्यातील सहभाग हा आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात तसेच संकलित केलेल्या पुराव्या अंती व अनेकांचे पथकाकडुन घेतले जात आहेत. तसेच जाबजबाब नोंदविल्यानंतर गुन्ह्यात सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्यांनाही अटक होण्याची शक्यता असल्याने या गुन्ह्यात अटक झालेल्या आरोपींची संख्या वाढणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com