जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

जिल्ह्यात राज्यभरात अपहार केल्याप्रकरणी बीएचआर पतसंस्थेच्या संचालकांविरोधात दाखल असलेल्या एकूण गुन्ह्यापैकी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तसेच पुण्यातील राजगुरुनगर, शिवाजीनगर, इंदापूर व तळेगाव दाभाडे या पाच ठिकाणच्या गुन्ह्यांच्या खटल्यावर मंगळवार, 12 जानेवार रोजी जिल्हा न्यायालयात कामकाज सुरु झाले आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे हजर असलेल्या 14 आरोपींनी यावेळी न्यायालयाला गुन्हा नाकबूल असल्याचे सांगितले.

संशयितांवर अपहार, गैरव्यवहाराचे आरोप ठेवले बीएचआर संस्थेच्या संचालकांनी ठेवीदारांच्या ठेवींचा अपहार व फसवणूक केल्याप्रकरणी राज्यातील 22 जिल्ह्यात 81 गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांचे खटले जळगाव जिल्हा न्यायालयात चालविले जाणार आहेत. सर्व गुन्ह्यांपैकी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तसेच पुण्यातील राजगुरुनगर, शिवाजीनगर, इंदापूर व तळेगाव, दाभाडे या पाच गुन्ह्यांच्या खटल्यांना मंगळवारी न्या.आर.एन.हिवसे यांच्या न्यायालयात काम सुरु झाले आहेेत. खटला सुरु होण्यासाठी मंगळवारी न्यायालयाने 14 संचालकांवर गैरव्यवहार व अपहाराचे आरोप ठेवले. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील केतन ढाके बाजू मांडत आहेत.

असे आहेत संशयित

या सर्व गुन्ह्यात संस्थेचे संस्थापक प्रमोद भाईचंद रायसोनी (55,रा.बळीराम पेठ, जळगाव), दिलीप कांतीलाल चोरडीया (51), सूरजमल भबुतमल जैन (50),दादा रामचंद्र पाटील (66), भागवत संपत माळी (63), राजाराम काशिनाथ कोळी (47), भगवान हिरामण वाघ (60), यशवंत ओंकार जिरी (60)शेख रमजान शेख अब्दुल नबी मन्यार (55),सुकलाल शहादू माळी (45)ललीताबाई उर्फ लता राजू सोनवणे (39) सर्व रा.तळेगाव, ता.जामनेर, मोतीलाल ओंकार जीरी (50,रा.शेळगाव, ता.जामनेर), डॉ.हितेंद्र यशवंत महाजन (52,रा.बेंडाळे नगर, प्रेम नगर, जळगाव) व इंद्रकुमार आत्माराम ललवाणी (40,रा.महाबळ, जळगाव) हे 14 आरोपी असून सर्व आरोपी जळगाव कारागृहात आहेत.

व्हीडीओ कॉन्फरन्सव्दारे संशयित हजर

खटल्याची सुनावणी करताना न्या.आर.एन.हिवसे यांनी कारागृहातून व्हिडीओकॉन्फरन्सद्वारे हजर झालेल्या 14 संशयित आरोपींना तुमच्यावर कट रचणे, फसवणूक, अपहार व एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हे दाखल असून त्या आधारावर दोषारोप ठेवण्यात येत असल्याचे सांगून, त्यावर तुमचे काय म्हणणे आहे. गुन्हा कबुल आहे का? अशी विचारणा केली. त्यावर सर्वच संचालकांनी आम्हाला गुन्हा नाकबुल असल्याचे सांगितले.