बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेला तारीख पे तारीख देण्यास नकार !

कंडारेच्या वकीलांना न्यायालयाने फटकारले
बीएचआर घोटाळा : जितेंद्र कंडारेला तारीख पे तारीख  देण्यास नकार !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर घोटाळ्यातील फरार असलेला मुख्य संशयित जितेंद्र कंडारे याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर आज गुरुवारी पुणे न्यायालयात कामकाज झाले.

वेळ काढू धोरणावर आज कंडारे यांच्यातर्फे बाजू मांडणार्‍या वकीलांना पुणे न्यायालयाने चांगलेच फटकारले असून 28 एप्रिल रोजी म्हणणे मांडण्याची अखेरची संधी न्यायालयाने दिली आहे.

दरम्यान, सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी कंडारेच्या तारीख पे तारीख धोरणावर आक्षेप घेत आज जोरदार युक्तिवाद केला.

मुख्य संशयित जितेंद्र खंडारेने पुणे कोर्टात जामीनासाठी अर्ज केला होता. परंतु प्रत्येक तारखेला कुठले तरी कारण देऊन कंडारे यांच्याकडील वकील तारीख पुढे घेत होते.

त्यावर आज सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी जोरदार आक्षेप घेत आरोपी पक्ष जर बाजू मांडत नसेल तर त्यांचा अर्ज रद्द करण्यात यावा, असा जोरदार युक्तिवाद केला.

त्यावर आज न्यायालयाने आरोपी पक्षाला चांगलेच फटकारत जामीन अर्जाचे कामकाज चालवावे अन्यथा 28 तारखेला कोर्ट त्या अर्जावर निर्णय घेईल, असे सांगितले.

दरम्यान बीएचआरच्या फसवणूक व अपहार प्रकरणात सुनील झंवर व माजी अवसायक जितेंद्र कंडारे या दोघांची अजूनही भागमभाग सुरूच आहे. दोघेही न्यायालयात हजर झाले नाहीत, किंवा पोलिसांना ते मिळून आले नाहीत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com