बीएचआर पतसंस्था घोटाळा : कोट्यवधींची मालमत्ता कवडीमोल भावात विक्री

सरकार पक्षाचा न्यायालयासमोर दाखल्यांसहित युक्तीवाद
बीएचआर पतसंस्था घोटाळा : कोट्यवधींची मालमत्ता कवडीमोल भावात विक्री

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या जामीन अर्जावर पुणे येथील न्यायालयात कामकाज सुरु आहे.

यात महावीर जैन याच्या अर्जावर सोमवारी युक्तीवाद झाला. यात सरकारपक्षाने महावीर जैन याने खोट असतांनाही फॉरेन्सिक ऑडीट कसे खरे भासविले?

हे सरकारपक्षाने युक्तीवादात मांडले. तसेच पुण्यासह ठिकठिकाणच्या बीएचआरच्या कोट्यवधींच्या मालमत्ता कवडीमोल भावात विकल्याच्या उदाहरणांवरुन स्पष्ट केले.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेने अटक केलेल्या संशयितांपैकी सुजीत वाणी, महावीर जैन, विवेक ठाकरे, धरम साखला, यांच्यासह इतर संशयितांनी जामीनासाठी अर्ज केले आहेत.

यात सुजीत वाणी याच्या जामीनावर युक्तीवाद पूर्ण झाला आहे. आज निकालावर कामकाज होते मात्र ते होवू शकले नाही.

सोमवारी महावीर जैन याच्या जामीनावर कामकाजाला सुरुवात झाली. हा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर विवेक ठाकरे याच्यासह इतरांच्या जामीन अर्जावर मंगळवार, 12 जानेवारी रोजी कामकाज सुरु होण्याची शक्यता आहे.

पुण्यातील मालमत्ता विक्रीची दिली उदाहरणे

सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी युक्तीवाद करतांना संशयितांनी बीएचआरची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता कवडीमोल दरात विकली याबाबत पुण्यासह इतर ठिकाणची काही उदाहरणे न्यायालयासमोर मांडली.

यात पुण्यात 8 कोटींची मालमत्तेची 3 कोटी 18 लाखांत विक्री करण्यात आली. यानंतर निगडी येथील 7 कोटींची मालमत्ता 2 कोटी 18 लाखात विक्री करण्यात आली. अशा पुणे व जळगाव शहरातील मिळून एकूण सहा मालमत्तांबाबतची उदाहरणे अ‍ॅड प्रवीण चव्हाण यांनी न्यायालयासमोर मांडली.

तसेच महावीर जैन हा बीएचआरचा लेखापरिक्षक होता. मात्र अशाप्रकारे कवडीमोल दरात मालमत्तांची विक्री झालेली असतांना खोटे फॉरेन्सिक ऑडीट खरे असल्याचे भासविल्याचेही अ‍ॅड चव्हाण यांनी युक्तीवादात मांडले.

आता पुढील कामकाज हे मंगळवार, 12 जानेवारी रोजी होणार आहे, असे अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी सांगितले. आरोपींकडून उमेश रघुवंशी काम पाहत आहेत.

आज पाच जणांचे नोंदविले जबाब

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी जळगावात ठाण मांडून असलेल्या पाच जणांच्या पथकांकडून जळगाव शहरात चौकशी सुरु आहे.

यात शनिवारी 6 जणांचे जाब जबाब नोंदविण्यात आले होते. आता आज सोमवारी पुन्हा पाच जणांचे जाब जबाब नोंदविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

नेमके कुणाचे जाबजबाब घेतले ते मात्र कळू शकलेले नाही. आणखी आठ ते दहा दिवस पथक जळगावात मुक्कामी आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com