बीएचआर पतसंस्था घोटाळा : अटकेतील 11 संशयित कारागृहात

पुणे न्यायालयाने सुनावली न्यायालयीन कोठडी : जळगाव जिल्ह्यातील आठ जणांचा समावेश
बीएचआर पतसंस्था घोटाळा : अटकेतील 11 संशयित कारागृहात

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बहुचर्चित भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट को ऑपरेटीव्ह या पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने 17 जून रोजी जळगाव जिल्ह्यासह धुळे, औरंगाबाद या जिल्ह्यांमधून 12 जणांना अटक केली होती.

चौकशीत अकोला येथील प्रमोद किसनराव कापसे रा. अकोला यांचा गुन्ह्यात सहभाग नसल्याचे निष्पन्न झाले नसल्याने त्यांना सोडून देण्यात आले आहे. उर्वरीत 11 संशयितांना अटक करुन न्यायालयात हजर केले असता, सर्व संशयितांना 22 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज मंगळवारी अटकेतील 11 संशयितांना पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्व संशयितांनी न्यायालयीन कोठडी पुणे येथील कारागृहात रवानगी केली आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटीत गैरकारभार तसेच फसणुकीबाबत फिर्यादी रंजना खंडेराव घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420, 464, 465, 468,471,474,120 ब, 34 सह एमपीआयडी ऍक्ट कलम 3 अन्वये 24 नोव्हेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने 17 जून रोजी जळगाव जिल्ह्यातील भागवत भंगाळे , प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला तिन्ही रा. जळगाव, जयश्री शैलेश मणीयार रा. पाळधी, जयश्री अंतिम तोतला रा. मुंबई, जितेंद्र रमेश पाटील रा. जामनेर, आसिफ मुन्ना तेली रा. भुसावळ, छगन शामराव झाल्टे रा. जामनेर, राजेश शांतीलाल लोढा रा. तळेगाव ता. जामनेर, यांच्यासह प्रितेश चंपालाल जैन रा. धुळे, अंबादास आबाजी मानकापे रा. औरंगाबाद या 11 जणांना केली आहे. अटकेनंतर सर्व 11 संशयितांना 22 जून पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने आज मंगळवारी सर्व संशयितांना पुणे येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. वेद पाठक यांनी सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांनी काम पाहिले.

अकोला येथील कापसेंना चौकशी करुन सोडले

पुणे आर्थिक गुन्हे शाखेने 17 जून रोजी अकोला येथून प्रमोद कापसे यांनाही ताब्यात घेतले होते. कापसे यांनी आर्थिक गुन्हे शाखेला कागदपत्रे सादर केली होती. त्यानुसार त्यांचा या गुन्ह्यात सहभाग नसल्याचे निष्पन्न झाल्याने चौकशीअंती त्याना सोडून देण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com