बीएचआर पतसंस्था घोटाळा : 9 संशयितांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

एजंटमार्फत 631 पावत्यांचे 18 कोटी रुपयांत कर्जात समायोजन
बीएचआर पतसंस्था घोटाळा : 9 संशयितांना 5 दिवसांची पोलीस कोठडी

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेल्या 9 संशयीत आरोपींनी एजंटच्या माध्यमातून 631 पावत्यांची 17 कोटी 95 लाख रुपये किंमतीच्या पावत्या त्यांनी घेतलेल्या कर्जाच्या रकमेत समायोजीत केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

त्याच आधारावर या सर्वांना अटक करण्यात आली असून त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील सेवानिवृत्त शिक्षिका रंजना घोरपडे यांनी डेक्कन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 25 नोव्हेंबर रोजी अवसायक जितेंद्र कंडारे यांच्यासह दहा जणांवर फसवणूक, अपहाराचा गुन्हा दाखल झाला होता.

तेव्हा संशयीत आरोपींना ताब्यात घेण्यासाठी 26 नोव्हेंबर रोजी आर्थीक गुन्हे शाखेतील 135 अधिकारी व कर्मचार्‍यांचे पथक जळगावात दाखल झाले होते. त्यावेळेस एजंट विवेक ठाकरे, सीए महावीर जैन, धरम सांखला, सुजीत वाणी यांच्या कंडारे वाहनचालक कोळी याला ताब्यात घेण्यात आले होते.

त्यानंतर या घोटाळ्याचा मास्टरमाईंड सुनिल झंवर याचा मुलगा सूरज झंवरला अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर तपास थंडावल्याचे चित्र निर्माण झाले होते परंतु आर्थिक गुन्हे शाखेचे पथक तपासकामी शहरात येत असून त्याचा सुगावा अनेकांना लागत नव्हता.

गेल्या आठवड्यात पथक सुमारे चार ते पाच दिवस शहरात ठाण मांडून बसले होते. त्यानंतर बीएचआरचे मुख्य कार्यालयाात दाखल होवून काही महत्वाचे पुरावे ते तपासासाठी घेवून गेले होते. दरम्यान याच प्रकरणात पुन्हा पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची 50 जणांची 10 पथके गुरूवारी जळगावात होती तर पाच पथक औरंगाबाद तसेच मुंबई, अकोला व पुणे येथे रवाना करण्यात आली होती.

सर्व संशयीत आरोपींच्या घराची झाडाझडती पथकाकडून घेण्यात आली. दरम्यान त्याठिकाणी बीएचआर संबधी आढळून आलेली सर्व कागदपत्रे पथकांकडून ताब्यात घेण्यात आली असून ही संपुर्ण कारवाई

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरिक्षक सुचिता खोकले यांच्या पथकाने केली.

सर्व संशयितांना एकाचवेळी घेतले ताब्यात

पंधरा पथकांनी एकाच वेळी धाडसत्र राबवून सराफ तथा हॉटेल व्यवसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे प्रेम नारायण कोगटा, जयश्री मणियार, संजय तोतला (सर्व रा़ जळगाव), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेंद्र लोढा (सर्व रा़ जामनेर), भुसावळ येथील माजी उपनगराध्यक्ष मुन्ना तेली यांचा मुलगा आसिफ तेली, प्रीतेश जैन (रा़ धुळे), अंबादास मानकापे (रा.औरंगाबाद), जयश्री तोतला (जळगाव) व प्रमोद कापसे (रा़ अकोला) या 12 जणांना अटक केली. दिवसभर अटक, पंचनामा व इतर प्रक्रिया पूर्ण करून ही पथके गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास संशयितांना घेवून पुण्यासाठी रवाना झाले.

9 संशयितांना पाच दिवस पोलीस कोठडी

बाहेरगावाहून अटक करण्यात आलेल्या प्रेम कोगटा, जयश्री तोतला व अंबादास मानकापे या संशयितांना गुरुवारीच पुणे न्यायालयात हजर करण्यात आले होते. तर उर्वरीत 9 जणांना शुक्रवारी सकाळी पुणे न्यायाालयातील न्यायाधीश के. पी. नांदेडकर यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. या सर्वांना पाच दिवसांची 22 जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com