बीएचआर पतसंस्था घोटाळा : जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

पुणे विशेष न्यायालयात कामकाज
बीएचआर पतसंस्था घोटाळा : जितेंद्र कंडारेचा अटकपूर्व जामीन फेटाळला

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर पतसंस्थेच्या घोटाळ्याप्रकरणी फरार असलेल्या बीएचआर पतसंस्थेचा तत्कालीन अवसायक व मुख्य संशयित जितेंद्र कंडारे यांचा अटकपूर्व जामीन आज बुधवारी पुणे न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

त्यामुळे जितेंद्र कंडारेच्या अडचणीत वाढ झाली आहे. कंडारेचा अटकपूर्व फेटाळल्यामुळे दुसरीकडे याच गुन्ह्यात फरार असलेल्या मुख्य संशयित सुनील झंवर यालाही मोठा झटका बसला असल्याची चर्चा आहे.

पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात ठेवीदाराच्या फसणूक केल्याप्रकरणी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को ऑपरेटीव्ह पतसंस्थेच्या अवसायक जितेंद्र कंडारे, सुनील झंवर यांच्यासह इतरांविरोधात गुन्हा दाखल आहे.

या गुन्ह्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव शहरातील बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयासह जितेंद्र कंडारे, सुनील झंवर, दलाल विवेक ठाकरे यांच्यासह इतरांच्या घरी तसेच कार्यालयावर छापे टाकले होते.

यात विवेक ठाकरे ,महावीर जैन, सुनील झंवर यांचा मुलगा सुरज झंवर यांच्यासह इतरांना अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात मुख्य संशयित असलेले जितेंद्र कंडारे व सुनील झंवर हे दोघे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार आहेत.

दरम्यान कंडारे याने पुणे येथील विशेष न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. त्यावर न्या. एस.एस.गोसावी यांच्या न्यायालयात युक्तीवाद पूर्ण होवून आज बुधवारी निकालावर कामकाज झाले.

यात न्या. एस.एस.गोसावी कंडारे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांनी कामकाज पाहिले. यापूर्वी 30 मार्च रोजी त्याचा अटकपूर्व फेटाळून लावण्यात आला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com