भागवत भंगाळे यांच्यासह 11 जणांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर

पुण्याला महिन्यातून दोनदा लावावी लागणार हजेरी : घेतलेल्या कर्जापैकी ऑक्टोंबरपर्यंत 40 टक्के रक्कम भरण्याची अट
भागवत भंगाळे यांच्यासह 11 जणांना सशर्त अंतरिम जामीन मंजूर

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात महिन्यातून दोनदा हजेरी, तसेच संशयितांनी वैयक्तिक घेतलेल्या एकूण कर्जापैकी दहा दिवसाच्या आत 20 टक्के रक्कम तर ऑक्टोंबर महिन्यापर्यंत 20 टक्के अशी एकूण 40 टक्के रक्कम भरण्याच्या अटीशर्तीवर भागवत भंगाळे यांच्यासह 11 संशयितांना बुधवारी पुणे न्यायालयाने अंतरीम जामीन मंजूर केला आहे.

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात 17 जून रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव जिल्ह्यातील भागवत भंगाळे , प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला रा. जळगाव, जयश्री शैलेश मणीयार रा. पाळधी, जयश्री अंतिम तोतला रा. मुंबई, जितेंद्र रमेश पाटील रा. जामनेर, आसिफ मुन्ना तेली रा. भुसावळ, छगन शामराव झाल्टे रा. जामनेर, राजेश शांतीलाल लोढा रा. तळेगाव ता. जामनेर, यांच्यासह प्रितेश चंपालाल जैन रा. धुळे, अंबादास आबाजी मानकापे रा. औरंगाबाद या 11 जणांना अटक केली होती.

बीएचआर पतसंस्थेतून मोठ्या प्रमाणावर कर्ज घेवून त्याची प्रत्यक्ष परतफेड न करता ठेवीदारांच्या ठेवी मॅचिंग करुन कर्ज फेड केल्याचे पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात निष्पन्न झाले होते. त्यानुसार संशयितांना अटक करण्यात आली होती.

न्यायालयाने काही संशयितांना पाच तर काहींना सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीनंतर न्यायालयाने न्यायालयीन कोठडीत संशयितांची कारागृहात रवानगी केली होती. या सर्व संशयितांनी जामीनासाठी पुणे येथील न्यायालयात अर्ज दाखल केले आहे. या जामीनअर्जावर युक्तीवाद पूर्ण होवून बुधवार, 14 जुलै रोजी निकालावर कामकाज झाले.

कर्जदारांना चपराक, तर ठेवीदारांना दिलासा

पुणे न्यायालयाने 11 संशयितांना अर्टी शर्तीवर अंतरीम जामीन मंजूर केला आहे. यात संशयितांना ठेवीदारांशी संपर्क ठेवता येणार नाही. तसेच प्रत्येक महिन्याच्या 1 व 15 तारीख असे दोन वेळा संशयितांना पुणे आर्थिक गुन्हे शाखा येथे हजेरी लावावी लागणार आहे. घेतलेल्या एकूण कर्जापैकी दहा दिवसाच्या 20 टक्के रक्कम तर ऑक्टोबरपर्यंत 20 टक्के रक्कम प्रत्येक संशयिताला वैयक्तिक भरावी लागणार आहे.

याप्रमाणे अटी शर्ती राहणार आहेत. ऑक्टोबर नंतर संशयितांनी एकूण किती रक्कम भरली व किती शिल्लक आहे, याबाबत बीएचआर पतसंस्थेचे अवसायक, गुन्ह्याचे तपासअधिकारी खात्री करतील. त्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार उर्वरीत रक्कम संशयितांना भरावी लागणार आहे. यातून कर्जदारांना न्यायालयाने एकप्रकारे चपराक लगावली आहे.

तर दुसरीकडे फरार असलेल्या संशयित प्रमोद कापसे याच्याकडून अटकेच्या भितीने ठेवीदारांच्या रकमा थेट ठेवीदारांच्या खात्यात जमा करण्यात येत असल्याने जळगाव जिल्ह्यासह इतर ठिकाणच्या ठेवीदारांना दिलासा मिळाला आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांनी काम पाहिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com