नागपूरच्या त्या उद्योजकाकडून जिल्ह्यातील 20 ठेवीदारांच्याही ठेवी परत

बीएचआर पतसंस्था घोटाळा : दोन दिवसांपासून प्रतिनिधी जळगावात ठाण मांडून
नागपूरच्या त्या उद्योजकाकडून जिल्ह्यातील 20 ठेवीदारांच्याही ठेवी परत

जळगाव - Jalgaon - किशोर पाटील :

बीएचआर घोटाळ्यातील संशयित नागपूर येथील उद्योजक रविंद्र किसन कापसे या उद्योजकाने अटकेच्या भितीने 7 जुलै रोजी इंदापूर तालुक्यातील निमगाव येथील 65 ठेवीदारांचे तब्बल 1 कोटी 15 लाख रुपये परत केले होते.

दरम्यान याच उद्योजकाकडून जळगाव जिल्ह्यातीलही 20 ठेवीदारांच्या रकमा थेट त्याच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती मंगळवारी एका ठेवीदाराने दै. देशदूतशी बोलतांना दिली आहे. यामुळे जिल्ह्यातील ठेवीदारांमध्येही आनंदाचे वातावरण पसरले आहे.

नागपूर येथील ओम शिवम बिल्डकॉनचे मालक रविंद्र किसन कापसे याने नागपूर येथीलच बीएचआर पतसंस्थेच्या शाखेतून तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज परत न करता नगर जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव येथील 65 तसेच पुणे व इतर ठिकाणचे असे एकूण 102 ठेवीदारांच्या ठेवी कर्जाच्या रकमेपोटी मॅच केल्या होत्या.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या 11 जणांच्या अटकेच्या केलेल्या कारवाईवेळी नागपूरातील रविंद्र किसन कापसे हा फरार झाला होता. यादरम्यान 7 जुलै रोजी कापसे याने ज्या ठेवीदारांच्या ठेवी मॅचिंग केल्या होत्या, अशा इंदापूर तालुक्यातील 65 ठेवीदारांचे एकूण एक कोटी 15 लाख रुपये परत केले होेते.

थेट ठेवीदारांच्या खात्यात या रकमा जमा करण्यात आल्या होत्या. आता कापसेने जळगाव जिल्ह्यातील काही ठेवीदारांच्या ठेवी कर्ज घेतेवेळी मॅचिंग केल्या होत्या. संबंधित ठेवीदारांना त्यांच्या ठेवीच्या रकमा परत करण्यासाठी कापसे यांचा एक प्रतिनिधी दोन दिवसांपासून जिल्हयात ठाण मांडून आहे.

या प्रतिनिधीकडून जळगाव शहर, एरंडोल, रावेर, पाचोरा, फत्तेपूर येथील 20 ठेवीदारांची माहिती घेवून त्यांच्या ठेवीच्या रकमा थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्या आहेत.

दोन दिवसांपासून संबंधित प्रतिनिधी जिल्ह्यात हेच काम करत आहे, अशी माहिती एका ठेवीदाराने नाव न छापण्याच्या अटीवर दै. देशदूतच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली आहे.

दरम्यान अनेक वर्षापासून अडकलेल्या ठेवींच्या रकमा पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या कारवाईमुळे परत मिळत असल्याने जळगाव जिल्ह्यातील ठेवीदारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. संबंधित ठेवीदारांकडून पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे आभार व्यक्त करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com