बीएचआर पतसंस्था घोटाळा : अटकेच्या भितीने 'त्या' उद्योजकाने ठेवीदारांचे १ कोटी रुपये केले परत

बीएचआर पतसंस्था घोटाळा : अटकेच्या भितीने 'त्या' उद्योजकाने ठेवीदारांचे १ कोटी रुपये केले परत

इंदापूर तालुक्यातील ६५ जणांना मिळाली १०० टक्के ठेवीची रक्कम

जळगाव - Jalgaon :

बीएचआर घोटाळ्यात मोठ्या प्रमाणावर कर्ज घेवून त्याबदल्यात ठेवीदारांच्या ठेवी मॅच करणार्‍या जळगाव जिल्ह्यासह औरंगाबाद अशा ११ जणांना पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती.

अटक होण्याच्या भितीने नागपूर येथील ओम शिवम बिल्डकॉनचे उद्योजक रविंद्र कापसे यांनी इंदापूर तालुक्यातील निमगाव येथील ६५ ठेवीदारांचे १ कोटी १५ लाख रुपये परत केले आहेत. कापसे यांने ठेवीदारांची १०० टक्के ठेवीची रक्कम परत केली आहे का, याची आमच्या फॉरेन्सिंक ऑडीटच्या टीमकडून खात्री केली जाईल. तसेच अधिकार्‍यांची चर्चा होवून त्यानंतर कापसे यास अटक करण्याबाबत निर्णय होईल.

सुचेता खोकले, पोलीस निरिक्षक, पुणे आर्थिक गुन्हे शाखा

यादरम्यान नागपूर येथील उद्योजक रविंद्र किसन कापसे हा मिळून आला नव्हता. या उद्योजकाने अटकेच्या भितीने इंदापूर तालुक्यातील निमगाव येथील ६५ ठेवीदारांचे तब्बल १ कोटी १५ लाख रुपये परत केले असल्याची माहिती मिळाली आहे.

ठेवीदारांना १०० टक्के रक्कम मिळाल्याने त्यांनी आज बुधवारी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात भेट घेवून कर्मचारी अधिकार्‍यांना याबाबतची माहिती दिली.

नागपूर येथील ओम शिवम बिल्डकॉनचे मालक रविंद्र किसन कापसे याने नागपूर येथीलच बीएचआर पतसंस्थेच्या शाखेतून तब्बल सव्वा तीन कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. मात्र हे कर्ज परत न करता नगर जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव येथील ६५ तसेच पुणे व इतर ठिकाणचे असे एकूण १०२ ठेवीदारांच्या ठेवी कर्जाच्या रकमेपोटी मॅच केल्या होत्या. पुणे आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या तपासात कापसे यांनी घेतलेले कर्ज व त्याची बेकायदेशीररित्या केलेली फेड ही बाब निष्पन्न झाली होती.

त्यानुसार कापसेसह अशाप्रकारचा गुन्हा करणार्‍या संशयितांच्या अटकेतील औरंगाबाद, जळगावसह, अकोला तसेच नागपूर याठिकाणी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने पथक रवाना झाले होते.

यावेळी जळगाव जिल्ह्यातील आठ जणांना, तर औरंगाबाद, मुंबई अशा एकूण ११ जणांना अटक करण्यात आली होती. नागपूरातील रविंद्र किसन कापसे हा फरार झाला होता. दरम्यान इतर संशयितांना अटक केल्यावर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली होती.

पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक होणार या भितीने नागपूर येथील उद्योजक रविंद्र कापसे याने ज्या ठेवीदारांच्या पावत्या विकत घेवून कर्जाच्या रकमेपोटी मॅचिंग केल्या होत्या. त्या ठेवीदारांच्या १०० टक्के रकमा थेट आरटीजीएसव्दारे परत केल्या आहेत.

याचप्रकारे इंदापूर तालुक्यातील निमगाव येथील ६५ ठेवीदारांना एकूण १ कोटी १५ लाख रुपये कापसे याने परत केले आहे. यापैकी प्रत्येकाला आपली ठेवीची १०० टक्के रक्कम परत मिळाल्याने ठेवीदारांनी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे कार्यालय गाठून माहिती दिली.

तसेच अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांचे आभार मानले असल्याची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षक सुचेता खोकले यांनी दै.देशदूतशी बोलतांना दिली आहे.

त्या ११ जणांच्या जामीन अर्जावर युक्तीवाद सुरु

बीएचआर घोटाळ्याप्रकरणी पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात १७ जून रोजी पुणे आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव जिल्ह्यातील भागवत भंगाळे , प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला रा. जळगाव, जयश्री शैलेश मणीयार रा. पाळधी, जयश्री अंतिम तोतला रा. मुंबई, जितेंद्र रमेश पाटील रा. जामनेर, आसिफ मुन्ना तेली रा. भुसावळ, छगन शामराव झाल्टे रा. जामनेर, राजेश शांतीलाल लोढा रा. तळेगाव ता. जामनेर, यांच्यासह प्रितेश चंपालाल जैन रा. धुळे, अंबादास आबाजी मानकापे रा. औरंगाबाद या ११ जणांना अटक केली होती.

या सर्व संशयितांनी जामीनासाठी पुणे येथील न्यायालयात अर्ज दाखल केले आहे. या जामीनअर्जावर युक्तीवादाला आज बुधवारी सुरुवात झाली आहे. सरकारपक्षातर्फे विशेष सरकारी वकील ऍड. प्रविण चव्हाण हे काम पाहत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com