बीएचआर पतसंस्था घोटाळा : लपविलेल्या 25 फाईल्स पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती

जितेंद्र कंडारेची एमआयडीसीतील मुख्य कार्यालयात 12 तास चौकशी
बीएचआर पतसंस्था घोटाळा : लपविलेल्या 25 फाईल्स पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याला सोबत घेत सोमवारी दुपारी पुणे आर्थिक गुन्हे शाखेचे पथक जळगावात आले होते.

तब्बल 12 ते 14 तासांच्या या चौकशीत कंडारेने एमआयडीसीतील बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील तळमजल्यावर लपविलेल्या महत्वपूर्ण अशा तब्बल 25 फाईल्स हस्तगत पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या हाती लागल्या आहेत. गुन्ह्यात पुरक पुरावा म्हणून या फाईल्स महत्वपूर्ण ठरणार असून त्या मिळाल्यानंतर आज मंगळवारी सायंकाळी 4 वाजता पथक कंडारेला सोबत घेवून पुन्हा पुण्याकडे रवाना झाले आहेत.

पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात बीएचआर घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल आहेत. या गुन्ह्यात सात महिन्यानंतर फरार असलेल्या मुख्य संशयित जितेंद्र कंडारेच्या पुणे आर्थिक शाखेच्या पथकाने इंदोरमधून मुसक्या आवळल्या.

तो सद्यस्थितीत 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत आहेत. दरम्यान पोलीस कोठडीत त्याच्याकडून गुन्हयासंदर्भातील माहिती तसेच कागदपत्रे संकलित करण्याचे काम पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून सुरु आहेत.

संशयित जितेंद्र कंडारे याला सोबत घेत दोन पोलीस निरिक्षक व सहा कर्मचारी अशा आठ जणांचे पथक सोमवारी दुपारी 2 वाजता जळगावात दाखल झाले होते. एमआयडीसीतील बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात गुन्ह्याचे तपासअधिकारी पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षक सुचेता खोकले यांच्या नेतृत्वात पथकाकडून तब्बल 12 ते 14 तास कंडारेची चौकशी करण्यात आली.

चौकशीनंतर पथक माघारी रवाना

गुन्ह्याकामी पुरक पुरावा म्हणून आवश्यक असलेल्या 20 ते 25 फाईल्स पुणे आर्थिक गुन्हे शाखेला मिळून आल्या नव्हत्या. तसेच कंडारेलाही अटक नसल्याने त्या फाईल्स मिळविण्यासाठी पथकाला अडचणी येत होत्या. मात्र कंडारेला अटक केल्यावर पथकाने संबंधित फाईल्सबाबत माहिती कंडारेला विचारली. चौकशीत त्याने सदरच्या फाईल्स जळगाव एमआयडीसीतील बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील तळ मजल्यावर लपविलेल्या असल्याची माहिती दिली होती.

त्यानुसार काल सोमवारी दुपारी 2 वाजता कंडारेला सोबत घेवून पुणे आर्थिक गुुन्हे शाखेचे पथक जळगावात आले. कंडारेने दिलेल्या माहितीनुसार पथकाने काल रात्री 12 वाजेपर्यंत काही फाईल्स हस्तगत केल्या होत्या. आज दुपारी 2 वाजेपर्यंत पथकाने पुन्हा काही फाईल्स या हस्तगत केल्या.

अशापध्दतीने सोमवारी दुपारी 2 ते मंगळवारी दुपारी 2 अशा 12 तासांत एमआयडीसीतील कार्यालयातील तळमजल्यावरुन पथकाने एकूण 25 फाईल्स हस्तगत केल्या आहेत. या कारवाईनंतर पथक आज मंगळवारी सायंकाळी कंडारेला सोबत घेत पुन्हा पुण्याकडे रवाना झाले.

नेमक्या कशाच्या आहेत फाईल्स

अवसायक असतांना जितेंद्र कंडारे याने बेकायदेशीरपणे कोट्यवधीचे कर्ज वाटप केली. कर्जदारांनी परतफेड न करता ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग करुन कर्जफेड केल्याबाबत निरंक असा दाखल घेतला होता. अशाचपध्दतीने कर्ज घेवून प्रत्यक्ष त्याची फेड न करता ठेवीदारांच्या पावत्या मॅचिंग करुन निरंकचे दाखल घेणार्‍या जळगाव जिल्ह्यासह औरंगाबाद येथून उद्योजक व्यापार्‍यांसह तब्बल 11 जणांना अटक केली आहे.

त्याच्यासह इतरही अनेक जणांना अशाच पध्दतीने कर्जवाटप केल्याबाबतची गुन्ह्याकामी आवश्यक असलेले दस्तऐवज या फाईल्समध्ये आहेत. या फाईल्स कंडारेने लपवून ठेवल्या होत्या. अशा 25 फाईल्स पथकाने आज हस्तगत केल्या आहेत. गुन्ह्यात पुरक पुरावा म्हणून या फाईल्स महत्वपूर्ण ठरणार असून त्यातील गुन्ह्याकामी आवश्यक माहिती मिळविण्यासाठी पुणे आर्थिक गुन्हे शाखा लेखा परिक्षकाची मदत घेणार असल्याची माहिती पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरिक्षक सुचेता खोकले यांनी दै. देशदूतशी बोलतांना दिली आहे.

‘त्याच’ कॅबीनमध्ये बसून कंडारेची 12 तास चौकशी

बीएचआर पतसंस्थेचा तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याने त्याच्या मनमानी पध्दतीने इतरांच्या सहकार्याने कोट्यवधींचा घोटाळा केला. जळगाव एमआयडीसीत बीएचआर पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयातील कॅबीनमध्ये अवसायक पदाच्या खुर्चीवर बसून कंडारेंना हा घोटाळा केला.

त्याच कॅबीनमध्ये बसून कंडारेची 12 ते 14 तास पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करण्यात आली. माझे काहीही होणार या अर्विभार्वात कंडारे होता मात्र कानून के हाथ लंबे होते, या उक्तीनुसार पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने अखेर कंडारेच्या मुसक्या आवळल्या.

आता इतरही बडे कर्जदार रडारवर

बेकायदेशीरपणे कर्ज घेवून प्रत्यक्षात त्याची परतफेड न करता ठेवीदारांच्या पावत्या कर्जांची परतफेड म्हणूून मॅचिंग करणारे गिरीश महाजन यांचे समर्थक जितेंद्र पाटील तसेच उद्योजक भागवत भंगाळे, प्रेम कोगटा यांच्यासह एकूण 8 जणांना जळगाव जिल्ह्यातून विविध ठिकाणांहून पुणे आर्थिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे. अटकेतील 11 जणांसह इतरांना दिलेल्या बेकायदेशीर कर्जाबाबत महत्वपूर्ण माहिती असलेल्या फाईल्स पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या हातात लागल्याने आता बेकायदेशीररित्या कर्ज घेवून त्याची परतफेड न करणारे इतरही बडे कर्जदार पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर असल्याची माहिती मिळाली आहे.

कंडारेच्या शिवाजीनगर येथील घराचीही झडती

दोन दिवसांपासून जळगावात ठाण मांडून असलेल्या पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून जितेंद्र कंडारे याच्या शिवाजीनगर येथील राहत्या घराची झडती घेण्यात अाली. घरझडतीत काही महत्त्वाची कागदपत्रे व इतर काही दस्तावेज हाती लागतील अशी अपेक्षा पथकाला होती. मात्र या झडतीत पथकाला मात्र काहीच मिळून आलेले नसल्याचीही माहिती मिळाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com