बीएचआर पतसंस्था घोटाळा : जितेंद्र कंडारे दहा दिवस पोलीस कोठडीत

बीएचआर पतसंस्था घोटाळा : जितेंद्र कंडारे दहा दिवस पोलीस कोठडीत

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

बीएचआर घोटाळ्यातील मुख्य संशयित जितेंद्र कंडारे रा. शिवाजीनगर, जळगाव याला 28 जून रोजी इंदोर येथून अटक करण्यात आली. त्याला बुधवारी पुणे येथील न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने संशयित कंडारे यास 10 दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट कॉ ऑप क्रेडीट सोसायटीत गैरकारभार तसेच फसणुकीबाबत फिर्यादी रंजना खंडेराव घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पुणे येथील डेक्कन पोलीस ठाण्यात भादंवि कलम 420, 464, 465, 468,471,474,120 ब, 34 सह एमपीआयडी ऍक्ट कलम 3 अन्वये 24 नोव्हेंबर 2020 रोजी गुन्हा दाखल झाला आहे.

हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या मुख्य संशयित जितेंद्र कंडारे याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने 28 जून रोजी रात्री साडेआठ वाजता इंदोर येथील एका फ्लॅटमधून अटक केली. संशयित कंडारेला काल मंगळवारी इंदोर येथील न्यायालयात हजर करुन पुण्याला आणण्यासाठी ट्रॉझिंट वॉरंट घेण्यात आले.

त्यानंतर पथक इंदोरहून संशयित कंडारेला सोबत घेवून आज बुधवारी पुण्याला पोहचले. संशयित कंडारे यास पुणे येथील न्या. एस.एस. गोसावी यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्या. गोसावी यांनी संशयित कंडारे यास दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रविण चव्हाण यांनी बाजू मांडली.

कंडारे हा घोटाळ्याच्या मास्टरमाईंड असून चौकशीत त्याच्याकडून बीएचआर घोटाळ्यातील अनेक कड्यांची उकल होणार असल्याची शक्यता होत आहे. तसेच कंडारेकडे चौकशीत सापडलेल्या डायरीत अनेक दिग्गजांची नावे असल्याची चर्चा असून संबंधित डायरीत नावे असलेली दिग्गज कोण आहेत हे तपासात समोर येणार आहे. त्यामुळे आता बीएचआर घोटाळयाच्या तपासात पुणे आर्थिक गुन्हे शाखेला बडे मासे गळाला लागण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com