भुसावळ (प्रतिनिधी) Bhusawal

नगरपालिका प्रशासनाने खासगी संस्थेला शहरातील सर्वच पथदिव्यांचे देखभाल-दुरुस्तीसह अन्य अनुषंगिक कामे दिली आणि या प्रक्रियेत कोट्यवधी रुपयांचे एलईडी पथदिवे लावले.

६० टक्के वीज बचत तसेच नपाचा वाचणारा मनुष्यबळ आणि देखभाल-दुरुस्ती खर्च मिळून वर्षाला सुमारे १ कोटीची बचत होईल असा अंदाज वर्तविला परंतु कॉन्ट्रॅक्टरने देखभालीकडे संपूर्ण दुर्लक्ष केले आणि खांब वाकले, तुटले गेले. शहराच्या मुख्य मार्गावरील दुभाजकांमध्ये लावण्यात आलेल्या पथदिव्यांची दुरुस्ती, खांबाची रंगरंगोटी करण्याच्या नावाखाली पथदिव्यांची यंत्रणा कोलमडली. परिणामी, मुख्य रस्त्यांवर अंधार पसरला, या समस्येकडे पालिकेचा विद्युत विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

हा प्रकार कमी म्हणून की काय, पथदिव्यांचा बोजवारा उडालेला असताना नियुक्त केलेल्या कंत्राटदारांनी झोपेचे सोंग घेतल्याची परिस्थिती निर्माण झाली म्हणून तातडीने पथदिवे दुरुस्तीची कामे मार्गी लावण्यासाठी पावले न उचलल्यास शिवसेना जिल्हाप्रमुख आ. चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुकाप्रमुख समाधान महाजन, उपजिल्हा प्रमुख ऍड. श्याम गोंदेकर, कार्यालयीन उपजिल्हाप्रमुख प्रा.उत्तम सुरवाडे, विधानसभा क्षेत्रप्रमुख संतोष सोनवणे, तालुका संघटक प्रा. धिरज पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचे शहरप्रमुख बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक दीपक धांडे, शहर संघटक योगेश बागुल, देवेंद्र पाटील, महिला आघाडीच्या तालुका संघटिका भुराताई चव्हाण, भारती गोसावी, छाया बोंडे, युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, उपशहर प्रमुख नबी पटेल, विक्की चव्हाण यांनी आंदोलनाचा इशारा नगरपालिका प्रशासनाला दिला होता.

शिवसेनेच्या आंदोलनाचा इशारा येताच मुख्य रस्त्यावरील पथदिव्यांची दुरुस्ती सुरू करण्यात आली आहे. शिवसेनेच्या मागणीला यश आले आहे. शिवसेनेच्या भूमिकेचे नागरिकांनी कौतुक केले. या कामाबरोबरच नगरपालिका प्रशासनाने शहरातील सार्वजनिक स्वच्छता, खड्डे दुरुस्ती, रस्ते पॅचिंग, दूषित पाणीपुरवठा व अन्य नागरी सुविधा सोडविण्यातही लक्ष घालण्याचे आवाहन केले शहरप्रमुख बबलू बर्हाटे यांनी केले आहे.