न्यायासाठी महिलेने अंगावर ओतले रॉकेल

पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात आत्महत्येचा प्रयत्न

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात चक्क महिलेने आम्हाला कोणी न्याय देत नाही म्हणत पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली.

शारदा श्रावण मोरे (30,रा.पिंप्राळा, हुडको) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करण्यार्‍या महिलेचे नाव असून तिच्याविरोधात पोलिसांनी स्वतः फिर्यादी होवून कलम 19 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

महिलेला ताब्यात घेतले

मुख्यालयाचे हवालदार प्रकाश बळीराम मेढे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन असे की, शारदा मोरे या महिलेने बुधवारी सायंकाळी सहा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय आवारात पोर्चच्या बाहेर आम्हाला कोणी न्याय देत नाही असे म्हणत सोबत आणलेली रॉकेलची बाटली अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर गार्ड ड्युटीचे प्रकाश मेढे, प्रसाद जोशी, राजेंद्र दोडे, मनोहर बाविस्कर, रवींद्र कोळी व दीपमाला सोनवणे यांनी धाव घेऊन महिलेला ताब्यात घेतले. नियंत्रण कक्षात या घटनेची माहिती दिली. या पोलिसांनी तिची समजूत घातल्यानंतर तिला तक्रार देण्यासाठी जिल्हा पेठ पोलिसांकडे पाठविले. थोड्यावेळाने ही महिला निघून गेली.

रामानंद नगर पोलीस ठाण्यातही गोंधळ

रामानंद नगर पोलीस ठाण्यातही या महिलेने बुधवारी रात्री 8 वाजता गोंधळ घातला. मुलगा रोहन (14) हा 11 रोजी घरातून निघून गेला असून महिलेने मुलगा हरविल्याची तक्रार दिली होती. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.

दुसर्‍या दिवशी हा मुलगा परत आला. या मुलाला कोणी तरी पळवून नेले होते व पोलीस त्याच्याविरुध्द कारवाई करीत नाही असा आरोप ही महिला करीत होती, म्हणून तिने दोन्ही ठिकाणी गोंधळ घातला.

सहायक पोलीस अधीक्षक कुमार चिंथा यांनी या महिलेची समजूत घालून या मुलाची चौकशी केली. त्यानंतर दोघांना घरी पाठविण्यात आले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com