जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

रेल्वे क्षमतेपेक्षा अधिक गर्दी असल्याने रेल्वेतून पडून पाय गमविलेल्या जगन चंद्रकांत पाटील (वय 30) रा. समतानगर या तरुणाला रेल्वेकडून तीन लाखाची नुकसान भरपाई देण्यात आली.

शहरातील समता नगरातील रहिवासी जगन पाटील हे 30 डिसेंबर 2012 रोजी महाराष्ट्र एक्सप्रेसने जळगाव ते कोपरगाव दरम्यान प्रवास करीत होते.

चाळीसगाव स्थानकाजवळ धावत्या रेल्वेतून पडल्यामुळे त्यांचा डावा पाय गुडघ्यापासून कापला गेला. या अपघातानंतर त्यांच्यावर चाळीसगावातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.

उपचाराअंती त्यांचा पाय गुडघ्यापासून खाली पुर्णपणे कापण्यात आला. रेल्वे पोलिसांनी या घटनेचा पंचनामा करीत अहवाल सादर केला होता.

तिकीट असल्याने मिळाली भरपाई

जगन पाटील यांच्याकडून प्रवासाचे तिकीट देखील मिळुन आले होते. उपचार घेऊन बरे झाल्यानंतर पाटील यांनी मुंबईच्या रेल्वे क्लेम ट्रीब्युनलकडे नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. सुनावणीअंती 8 वर्षानंतर न्यायालयाने पाटील यांना 3 लाख 20 हजार रुपयांची नुकसान भरपाई दिली.

क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांमुळेच घडला अपघात

जगन पाटील हे प्रवास करीत असलेल्या दिवशी महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये क्षमतेपक्षा जास्त प्रवासी प्रवास करीत होते. गाडीत गर्दी झालेली असल्यामुळेच पाटील हे खाली पडले. त्यामुळे त्यांना 4 लाख रुपयांची भरपाई द्यावी असा युक्तीवाद पाटील यांचे वकील अॅड. महेंद्र सोमा चौधरी यांनी केला होता. सुनावणीअंती 3 लाख 20 हजार रुपयांची भरपाई देण्यात आली.