करोना रुग्णांच्या याद्यांची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर !

आशा स्वयंसेविकांवर कामाचा वाढला ताण; शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी
करोना रुग्णांच्या याद्यांची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर !

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जी मोहिम हाती घेतली आहे . त्या कामामध्ये आशा स्वयंसेविकांना जुंपण्यात आले आहे.

आरोग्यवर्धिनी अंतर्गत असंसर्गजन्य पाच प्रकारच्या आजारांची माहिती त्यांना घ्यावी लागते. यात घरातील 30 वर्षापुढील व्यक्तींचा फार्म भरावा लागतो. त्यासाठी प्रति फॉर्म सुमारे अर्धा तास लागतो. या कामासाठी शासनाकडून फक्त 10 रू. मोबदला ठरवण्यात आला आहे.

आशांनी किमान दररोज पाच फॉर्म भरण्याचे उद्दीष्ट त्यांना देण्यात आले आहे. त्यांनी जमा केलेल्या माहितीचा फोल्डर तयार करून प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन द्यावा लागतो व ऑनलाईन फॉर्म भरण्याकरीता मदत करावी लागते.

कोविड व्हॅक्सीन अंतर्गत 45 व 60 वर्षे वयाच्या व अतिगंभीर रूग्णांच्या याद्या तयार करण्याची जबाबदारी आशा स्वयंसेविकांवर टाकली आहे. त्यामुळे आशा स्वयंसेविकांवर कामाचा ताण वाढला असून त्यांना शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी आशा स्वयंसेविकांनी केली आहे.

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून महाराष्ट्र सरकार अंशतः लॉकडाउन करण्याच्या मनस्थितीत आहे. प्रादुर्भावाचे प्रमाण वाढत असून मृत्यूदरांत सुध्दा वाढ होत आहे. म्हणून महाराष्ट्र सरकारने सार्वत्रिक लसीकरणाची मोहिम हाती घेतली आहे.

आशांना कुटूंब व पाणी स्वच्छतेचा सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. अ‍ॅनिमिया मुक्त भारत अभियान या मोहिमेत 6 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांना रक्तवाढीच्या गोळया आठवडयातून एकदा देण्याचे काम आशांवर लादण्यात आले आहे.

सद्य परिस्थितीत शाळा बंद असल्याने आशांना घरोघरी जावून गोळया वाटाव्या लागतात. आशांच्या कार्यक्षेत्रांतील 1ली ते 4थी तील विद्यार्थ्यांना जंतनाशक गोळया वाटपाचे काम आशांना करावे लागते व त्यासाठी त्यांना घरोघरी फिरावे लागते.

20 ते 49 वयोगटांतील महिलांना रक्तवाढीच्या व कॅल्शीयमच्या गोळया वाटण्याचे काम आशांना सांगण्यात येते. शाळा बंद असल्यामुळे धर्नुवाताचे इंजेक्शन देण्यासाठी लसीकरण सत्रामध्ये लाभार्थी बोलावण्याचे काम आशांवर लादण्यात आले आहे.

मार्च पासून ग्रामिण व शहरी भागांत आशा व गटप्रवर्तकांची सक्तीची डयूटी लावण्यात आली आहे. या मोहिमेमध्ये आशा व गटप्रवर्तकांना स. 9 ते सायं. 6 पर्यंत सक्तीची डयूटी देण्यात येते. काही ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्रात येवून आशांना लाभार्थीची रॅपिड टेस्ट करावी लागते.

दैनंदिन लसीकरणाच्या आढाव्यापासून शासनाच्या सर्व योजनांचा दैनंदिन आढावा गटप्रवर्तकांकडून घेतला जातो. गटप्रवर्तकांना 20 ग्रामिण भेटी देण्याचे त्यांचे मुळ काम असताना अशा प्रकारचे काम कसे व कधी करणार असा सवालही त्यांनी उपस्थितीत केला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com