जळगाव । प्रतिनिधी) - Jalgaon

जळगाव - पिंप्राळा परिसरात असलेल्या शेतात घोडे चरण्यास येवून पिकाचे नुकसान झाल्याने त्याचा जाब विचारण्यास घोडे मालकाला गेलेल्या शेतकरी जितेंद्र अरुण कोळी याच्यावर विळ्याने वार केल्याची घटना 18 जानेवारी रोजी सायंकाळी घडली होती. रामानंदनगर पोलिसात दाखल या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात संशयित सुपडू चंद्रकात ठाकरे वय 27 रा. पिंप्राळा मढी चौक यास पोलिसांनी अटक केली आहे.

पिंप्राळा शिवारात जितेंद्र कोळी यांचे शेत आहे. या शेतात काही दिवसांपूर्वी सुपडू ठाकरे याच्या मालकीचे घोडे चरायला आले होते. त्यामुळे पिकांचेही नुकसान झाले होते. याबाबत जितेंद्र कोळी हे 18 जानेवारी रोजी सुपडू ठाकरे याच्याकडे गेले. त्यांनी तुझे घोडे शेतात चरून पिकांचे नुकसान करत असल्याचे सांगितले.

तसेच यापुढे असे व्हायला नको असेही कोळी म्हणाले. याचा राग आल्याने ठाकरे याच्यासह मिलिंद मितेश जाधव या दोघांनी जितेंद्र कोळी याच्यावर विळ्याने वार केले होते. याप्रकरणी जखमी जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या जबाबावरुन सुपडू चंदक्रांत ठाकरे व मितेश मिलिंद जाधव याच्याविरोधात रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

25 पर्यंत कोठडी

दरम्यान यातील संशयित सुपडू ठाकरे याच्याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक रविंद्र पाटील यांना माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी शिवाजी धुमाळ, विजय खैरे, उमेश पवार, रविंद्र चौधरी या पथकासह संशयित ठाकरे यास अटक केली. त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास 25 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याचाही पोलीस शोध घेत आहेत.