खासगी रुग्णालयांवर नियंत्रणासाठी भरारी पथकांची नियुक्ती

खासगी रुग्णालयांवर नियंत्रणासाठी भरारी पथकांची नियुक्ती
जिल्हाधिकारी अभिजित राऊत

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा भाग म्हणून खासगी रुग्णालयांवर दर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभिजित राऊत यांनी महानगरपालिका (Jalgaon Municipal corporation) क्षेत्र वगळून इतर क्षेत्राकरीता भरारी पथकांची नियुक्ती केली आहे.

कोविड 19 बाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळण्यासाठी खासगी रुग्णालयांनी आकारवयाच्या कमाल दर मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे. महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांना लागू करण्यात आलेली आहे. खासगी वाहने, रुग्णवाहिका अधिग्रहीत करुन शासन स्तरावर त्यांचे कमाल दर निश्चित केलेले आहेत. त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करुन देण्याबात सूचना निर्गमित करण्यात आलेल्या आहेत.

खासगी रुग्णालयांच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जळगाव महानगरपालिका क्षेत्र वगळून उर्वरीत क्षेत्राकरीता पुढीलप्रमाणे भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. ते असे : पथकप्रमुख- उपविभागीय अधिकारी, सदस्य- निवासी नायब तहसीलदार, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, पोलिस उपनिरीक्षक, उपकोशागार अधिकारी, अव्वल कारकून (कोशागार), संबंधित तलाठी.

वरील प्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या पथकाने शासन निर्णयात नमूद सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन होत आहे किंवा नाही याची खातरजमा करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत सर्व खाजगी रुग्णालयांनी दाखल होणा-या रुग्णांना कॅशलेस सुविधा देणे आपेक्षित आहे याबाबतची तपासणी करावी.

सदर पथकाने त्यांचे कार्यक्षेत्रातील संबंधित सर्व खाजगी रुग्णालयांना भेटी देऊन तपासणी करावी, व या बाबतचा तपासणी अहवाल कार्यालयास सादर करावा, महापालिका क्षेत्रासाठी आयुक्त यांनी यापूर्वीच अशा पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे, असेही जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी म्हटले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com