डॉ.किसन पाटील स्मरणार्थ वाङ्मय पुरस्कारांची घोषणा

डॉ.किसन पाटील स्मरणार्थ वाङ्मय पुरस्कारांची घोषणा

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

मराठीतील ख्यातनाम संशोधक, समीक्षक, साहित्यिक प्राचार्य डॉ. किसन पाटील (जळगाव) यांचे नुकतेच आकस्मिक निधन झाले.

डॉ. पाटील यांच्या जाण्याने वाङ्मय अन् संशोधन क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. डॉ. पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे प्राचार्य डॉ.किसन पाटील खानदेशस्तरीय वाङ्मय पुरस्कार आणि प्राचार्य डॉ. किसन पाटील राज्यस्तरीय वाङ्मय पुरस्कार या दोन वाङ्मय पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

खानदेशस्तरीय वाङ्मय पुरस्काराचे स्वरूप रोख पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे असेल. या पुरस्कारांसाठी जळगाव, धुळे व नंदुरबार या खानदेशातील लेखकांकडून कथा, कविता, कादंबरी, ललित, संशोधन अशा सर्वच वाङ्मयप्रकारातील पुस्तक,ग्रंथ ग्राह्य धरण्यात येतील.

राज्यस्तरावरील वाङ्मय पुरस्कार आलटूनपालटून एकेका वाङ्मयप्रकारासाठी देण्यात येतील. यावर्षी कथा या वाङ्मय प्रकारासाठी पुरस्कार देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. कथासंग्रह यावर्षी पुरस्कारासाठी ग्राह्य धरण्यात येईल.

राज्यस्तरीय पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे असेल.या दोन्ही पुरस्कारांसाठी इच्छुकांनी संबंधित वाङ्मयप्रकारातील 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीत प्रकाशित झालेल्या ग्रंथाच्या प्रत्येकी दोन प्रती, अल्पपरिचय व पासपोर्ट आकारातील छायाचित्र 25 मे 2021 पर्यंत पाठवावेत. 12 जून 2021 ला प्राचार्य डॉ. किसन पाटील यांच्या जन्मदिनी पुरस्कार जाहीर करण्यात येतील.

पुरस्कारांचे वितरण कोविडचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर यथावकाश करण्यात येईल. या पुरस्काराबाबत प्रवेशिका महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांच्या नालंदा, प्लॉट नं. 26, गट नं. 16, तर 17, एन. रामाराव गृहनिर्माण सोसायटी, श्रीरत्न कॉलनी पिंप्राळा, जळगाव या पत्त्यावर पाठवाव्यात, असे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे कळविण्यात आले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com