भुसावळ । प्रतिनिधी Bhusawal

गाळे खरेदी व्यवहारात ममता सनांसे यांची 60 लाख 70 हजार रुपये घेऊन गाळे खरेदीत फसवणूक केल्या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात दाखल गुन्ह्यात माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. त्याबाबत न्यायालयात 18 रोजी सुनावणी होऊन अटकपूर्व जामिन फेटाळण्यात आला.

माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी येथील ममता सुधाकर सनांसे यांची रुपये 60 लाख 70 हजार रुपये घेऊन गाळे खरेदी न करून दिल्यामुळे याबाबत बाजारपेठ पोलीसात भा.दं.वि. 420 504 व 506 अन्वय फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.

त्याबाबत श्री. चौधरी यांनी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केलेला होता. त्यावर 16 रोजी सुनावणी झाली त्यांच्या बाजूने अॅड. सागर चित्रे यांनी युक्तिवाद करताना सदरचा गुन्हा हा दिवाणी स्वरूपाचा असल्यामुळे जामीन मंजूर करण्यात यावा असे सांगितले.

सरकार पक्षाच्या बाजूने सरकारी वकील शीला गोडांबे यांनी सदरचे प्रकरण हे गंभीर आर्थिक स्वरूपाचे असून आर्थिक गुन्हेगारी ही समाजाची पाळेमुळे पोखरून काढतात व सदर गुन्ह्यात फसवणुकीची रक्कम फार मोठी असून सामान्य माणसासाठी खूप मोलाची आहे तसेच आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी बघता सदर प्रकरणात जामीन मंजूर करू नये तसेच आरोपीने पैसे आरटीजीएसद्वारे घेऊन खरेदी खतावर सह्या करून खरेदी खत पूर्ण न केल्यामुळे विश्वासघात केलेला आहे. हे स्पष्ट दिसत असल्याने जामीन नामंजूर करावा असा युक्तिवाद केला.

पोलिसांतर्फे तपासाधिकारी कृष्णा भोये यांनी सदर गुन्ह्यातील रक्कम हस्तगत करणे ती कुठे वापरली गेली याचा तपास करावा याचा आहे तसेच खरेदी खतावर केलेल्या सह्या व अंगठा हे आरोपीला ताब्यात घेतल्याशिवाय त्याचा तपास करता येणार नाही तसेच या गुन्ह्यात आणखी कोणी सामील आहे किंवा नाही याचा तपास करावयाचा असल्याने आरोपीला अटक करणे आवश्यक आहे.

फिर्यादी तर्फे अॅड. कृष्णा बनकर व अॅड. बि.बी. गामोट यांनी काम पाहिले त्यानंतर कोर्टाने तडजोडीची शक्यता असल्यास तडजोड करून प्रकरण निकाली काढावे असा सल्ला अॅड. चित्रे व अॅड. कृष्ण बनकर यांना दिला परंतु सत्र न्यायाधीश र. रा. भागवत यांच्यासमोर प्रत्यक्ष झालेल्या युक्तीवादात तडजोड झाली नाही सत्र न्यायाधीश एस. बी. भंसाली यांनी अनिल चौधरी यांचा अटकपूर्व जामीन नामंजूर केला.