मोकाट श्वान किती जणांचे तोडणार लचके

पालीका प्रशासनाचे दुर्लक्ष - नागरीकांचा आंदोलनाचा इशारा
मोकाट श्वान किती जणांचे तोडणार लचके

वरणगांव, ता . भुसावळ प्रतिनिधी Bhusawal

शहरात महीनाभरापासून मोकाट श्वानांनी थैमान घातले असुन आतापर्यंत या श्वानांनी सहा जणांना चावा घेतला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे . यामुळे नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात संतप्त भावना निर्माण झाल्या असून भयभयीत झालेल्या नागरीकांनी पालीका प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे.


वरणगांव शहरात गेल्या काही महिन्यांपासुन मोकाट श्वानांनी हैदोस घातला आहे . दि .२६ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास भोगावती नदीपात्राजवळील मुख्य मार्गावर गजानन धनगर, शेख रईस शेख सकाऊद्दीन, आलम कच्छी या तिघांवर मोकाट श्वानांनी हल्ला करून जख्मी केले .यानंतर १५ दिवसापुर्वी अक्सा नगरातील रहीवाशी शेख हाफीस शेख रहेमान यांच्या मालकीच्या चार बकऱ्यांवर मोकाट श्वानांच्या समूहाने हल्ला करून त्यांचा फडशा पाडला . हि घटना ताजी असतानांच शनिवारी दुपारच्या सुमारास अक्सा नगरात श्वानांनी हल्ला करून समीर सय्यद (वय-१२), फिरोज खान ( वय - ५० ), तैमुर खान ( वय - ३ ) अशा तिघांना जख्मी केले . यापैकी तैमुरची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले आहे . या सर्व प्रकाराने नागरीक भयभयीत झाले असुन नगर परिषद प्रशासनाने मोकाट श्वानांचा बंदोबस्त न केल्यास माजी उपनगराध्यक्ष शेख अखलाख शेख युसुफ, शिवसेनेचे शेख सईद शेख भिकारी यांचेसह नागरीकांनी नगर परिषदेला मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अन्यथा तिव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिले आहे .

निवीदेतही राजकारण?

शहरातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पुढे आली होती . त्यानुसार नगर परिषदेने निवीदा काढली होती . मात्र, आलेली निविदा जादा रकमेची व त्यातल्या त्यात निवीदा नगराध्यक्षांच्या जवळच्या माणसाची असल्याने हि निविदा नामंजुर करण्यात आली . यामुळे वरणगांवातील २५ कोटी रुपयाच्या निवीदेवरून गाजलेले रणकंदन मोकाट श्वानांच्या बंदोबस्त्याच्या निवीदेचे राजकारणही समोर येत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे .

सुदैवाने शाळा बंद

कोरोनामुळे सर्व लहान विद्यार्थ्यांच्या शाळा सुदैवाने बंद आहेत . अन्यथा मोकाट श्वानांनी लहान विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांना जख्मी केले असते . यामुळे नगर परिषदेने शाळा सुरु होण्यापुर्वी मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे .

वाहनांचे मागे धावतात श्वान

शहरात अनेक नागरीकांना रात्री - अपरात्री येणे - जाणे करावे लागते . अशा वेळी रस्त्याच्या कडेला बसलेले श्वान दुचाकीच्या मागे धावतात यामुळे वाहनधारकांची धांदल उडते . तसेच पादचाऱ्यानांही श्वानांचा त्रास सहन करीत जीव मुठीत घेवुन मार्गक्रमण करावे लागत आहे .

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com