शिवसेनेला अंतर्गत कलहाचे ग्रहण

सप्ताह घडामोडी : अमोल कासार
शिवसेनेला अंतर्गत कलहाचे ग्रहण

राज्यात सत्तेत येण्यासाठी शिवसेनेने चांगलीच राजकीय खेळी खेळत राज्याची सत्ता काबीज केली. महाविकास आघाडीत शिवसेनेने किंगमेकरची भूमिका बजावली. त्यानंतर मनपात देखील शिवसेनेच्या नेतेमंडळींना डावलून शिवसेनेतील पदाधिकार्‍यांनी थेट नगरविकास मंत्र्यांना भेटलेत. जळगाव महापालिकेत बहुमतात असलेल्या भाजपाला खिंडार पाडत मनपावर शिवसेनेचा भगवा फडकविला.

ही बाब सत्तेत असलेल्या शिवसेनेसाठी अत्यंत चांगली आहे .पण आता थेट जिल्ह्यातील नेतेमंडळींवरच पक्षातील पदाधिकार्‍यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.काही जण उघड-उघड बोलून दाखवत असल्याची राजकीय गोटात चर्चा आहे.

संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी घेतलेल्या शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत अनेक निष्ठावंतांनी पाठ फिरवल्यामुळे शिवसेनेला अंतर्गत कलहाचे ग्रहन लागले की काय असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

काही दिवसांपासून शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आले आहे. यामध्ये गटा-तटाचे राजकारणासह नेतेमंडळींवरच आरोप होवू लागल्याने प्रत्येक जण आपले वर्चस्व सिद्ध करीत समोरच्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.

मनपात बंंडखोर नगरसेवकांविरुद्ध निष्ठावान कार्यकर्ते असे चित्र निर्माण झाल्याने त्यांच्यात गटा-तटाचे राजकारण सुरु झाले आहे. तर दुसरीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील यांच्यात काही दिवसांपासून वाकयुद्ध सुरु असल्याने हे दोघेही नेते संधी मिळेल त्याठिकाणी एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करत असतात.

याचा प्रत्यय सोमवारी पारोळ्यात झालेल्या शिवसंपर्क अभियानाच्या बैठकीत उपस्थित मान्यवरांसह कार्यकर्त्यांनी देखील अनुभवायला मिळाला. दरम्यान, संपर्कप्रमुख सावंत यांनी यावर पडदा टाकत सारवासारव करीत शिवसेनेत गटबाजी नसल्याचे सांगितले.

मात्र सावंत यांच्यावरच पक्षातील काही पदाधिकार्‍यांकडून आरोप केले जात असल्याने त्यांनी जिल्हाबैठकीत आरोप करणार्‍यांचे कान टोचले. एकीकडे सावंतसाहेब पक्षात कुठल्याच प्रकारचे गट-तट नसल्याचे सांगतात आणि दुसरीकडे पक्षाच्या जिल्हा बैठकीत गटा-तटाचे राजकारण करणार्‍यांना कारवाईचा इशारा देतात.यावरुन शिवसेनेत अंतर्गत कलह असल्याचे स्पष्ट झाले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com