जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत 13 रुग्णवाहिका दाखल

पालकमंत्री गुलाबराव पाटलांंच्याहस्ते रुग्णवाहिकांचे लोकार्पण
जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत 13 रुग्णवाहिका दाखल

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

करोना काळात संपुर्ण आरोग्य यंत्रणेची तारांबळ उडाली होती. त्यामुळे शासनाकडून आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी वेगवेगळी अत्याधुनिक साधन सामुग्री दिली जात आहे.

त्यानुसान पालमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणा बळकटीकरणासाठी शासनाकडे रुग्णावाहिकांची मागणी केली होती. शासनाकडून 13 रुग्णावाहिकांसह आदिवासी भागातील नागरिकांसाठी अद्यावत अशी मोबाईल मेडीकल युनिट दिले असून त्याचे आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

जिल्ह्यातील अनेक ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये असणार्‍या रूग्णवाहिकांची कालमर्यादा संपल्यामूळे रुग्णांची ने-आण करण्यासाठी प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत होता. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे रूग्णवाहिकांची आवश्यकता निर्माण झाली. याची दखल घेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी राज्य शासनाकडे जळगाव जिल्ह्यासाठी 35 रूग्णवाहिकांची मागणी केली होती.

याला शासनाने मंजुरी दिली असून यातील पहिल्या टप्प्यात 13 रूग्णवाहिका जिल्ह्यासाठी प्राप्त झाल्या आहेत. या रूग्णवाहिकांचे आज शनिवारी जिल्हा रूग्णालयात लोकार्पण करण्यात आले. पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी हिरववी झेंडी दाखवून या रूग्णवाहिका शासकीय सेवेसाठी अर्पीत केल्या. यात 13 रूग्णवाहिका असून त्या जिल्ह्यातील विविध ग्रामीण रूग्णालयांना प्रदान करण्यात आल्या.

याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजीराव चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, जि.प. आरोग्य सभापती रवींद्र पाटील, जि.प.सदस्य अमित पाटील, दीपक राजपूत, उद्धव मराठे, टेम्पो फोर्स कंपनीचे संचालक चंद्रशेखर अग्रवाल, आतिष सोनवणे, सेवा अभियंता विवेक नारखेडे उपस्थित होते.

आदिवासी पाड्यांवर औषधोपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठी प्रशासनाने अद्ययावत सामग्रीने सज्ज मोबाईल मेडिकल युनिट रूग्णवाहिका दिली आहे. या रुग्णवाहिकेत ऑक्सिजन बेड, महिलेची प्रसुती देखील होवू शकते अशी व्यवस्था तयार करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर या तालुक्यांमधील आदिवासी बहुल भागांमध्ये नियमितपणे फिरवण्यात येणार आहे. यामुळे दुर्गम भागातील रूग्णांना देखील थेट त्यांच्या पाड्यावर अद्ययावत उपचार मिळणार आहेत. तसेच यामध्ये डॉ. कांचन बारी, लॅब असिस्टंट जयराम जाधव, निलेश सोनवणे, अरुण चौधरी, दीपक शिंदे हे राहणार आहे.

5 उपजिल्हा तर 8 प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळाल्या रुग्णवाहिका

जिल्ह्यातील पाल, रावेर, अमळनेर या ग्रामीण रुग्णालयाला तसेच मुक्ताईनगर व जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयाला अश्या 5 ठिकाणी तर प्राथमिक आरोग्य केंद्र अमळनेर तालुक्यातील मांडळ, भडगाव तालुक्यातील कजगाव, चाळीसगाव तालुक्यातील रांजणगाव व उंबरखेड, चोपडा तालुक्यातील अडावद व वैजापूर, जामनेर तालुक्यातील वाकोद तर पाचोरा तालुक्यातील लोहारा अशा 8 प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका देण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com