अमळनेरचा यात्रोत्सव रद्द

रथोत्सव जागेवर : यंदा प्रतिपदेला पालखी सोहळा,ऑनलाईन प्रक्षेपणाचा लाभ घ्या - हभप प्रसाद महाराज
अमळनेरचा यात्रोत्सव रद्द
संत सखाराम महाराज संस्थानचे गादीपूरूष प्रसाद महाराज

अमळनेर - Amalner - प्रतिनिधी :

संपूर्ण खान्देशात प्रसिध्द असलेला संत सखाराम महाराजांच्या यात्रोत्सव कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रद्द करण्यात आला असून सलग दूसर्‍या वर्षी देखील बोरीचे वाळवंट रिक्त राहणार आहे.

मात्र मोजक्या लोकांच्या उपस्थितीत दि.14 रोजी अक्षय तृतीयेला स्तंभरोपण बोरीच्या वाळवंटात करून औपचारिक रित्या यात्रोत्सवाला प्रारंभ होणार आहे, तर दि 23 मे रोजीचा रथोत्सव मिरवणूक न काढता जागेवरच रथपूजा, समाधी मंदिराला पालखीची प्रदक्षिणा घालण्यात येणार असून भाविकांनी गर्दी करू नये. त्यांच्यासाठी हा सोहळा ऑनलाईन करण्यात येणार असून त्यांनी ऑनलाईन लाभ घ्यावा, असे आवाहन संत सखाराम महाराजांचे गादी पुरुष हभप प्रसाद महाराज यांनी केले आहे.

मोजक्या लोकांमध्ये भजन, काल्याचे कीर्तन आदी कार्यक्रम होतील. कोरोनामुळे कोणत्याही भाविकांनी गर्दी करू नये. त्यांच्यासाठी ऑनलाईन कार्यक्रम प्रदर्शित करण्यात येणार आहे, त्याचा लाभ घ्यावा.

हभप प्रसाद महाराज, गादीपूरूष संत सखाराम महाराज संस्थान, अमळनेर

सालाबादा प्रमाणे परंपरेनूसार अक्षय तृतीयेपासून वाडी संस्थानतर्फे बोरी नदीपात्रात संत सखाराम महाराज यात्रोत्सव साजरा होत असतो. या यात्रोत्सवाला 200 वर्षाहून अधिकची परंपरा असून गेल्या वर्षा पासून यात खंड पडला आहे. यावेळी देखील कोरोनाची दूसरी सूरू लाट असल्याने लॉकडाऊनमूळे यात्रोत्सव रद्द करण्यात आला नदीपात्रात पाळणे, फुगे, काकड्या, खाद्यपदार्थ वस्तू, मौत का कुवा, विविध मनोरंजनाची खेळणी, जादूचे प्रयोग, घरगुती वस्तूंची दुकाने, मीना बाजार, महिलांच्या विविध आभूषणाची दुकाने, भेळ, पाणीपुरी, पावभाजी, उसाचा रस, आईस्क्रीम अशी दुकाने थाटलेली असतात.

संपूर्ण बोरी नदी परिसर लायटिंग रोषणाईने नटलेला असतो. संपूर्ण खान्देशसह महाराष्ट्रातून लाखो भाविक रथ आणि पालखी मिरवणुकीला हजेरी लावत असतात. मात्र सतत दुसर्‍या वर्षीदेखील कोरोनाने कहर मांडला असून शासनाने यात्रा आणि धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घातल्याने यंदाही यात्रा रद्द करण्यात आली आहे.

परंपरेप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत 14 मे रोजी अक्षय तृतीयेला सकाळी साडेनऊ वाजता वाडी संस्थानमध्ये स्तंभारोपण, पूजा करण्यात येईल. त्यांनतर दशमीला बेलापूरकर महाराज यांच्या दिंडीचे आगमन होत असते. मात्र यंदाही बेलापूरकर महाराज चारचाकी वाहनाने अमळनेरला येतील व समाधीवर त्यांच्या भजनाचा कार्यक्रम होईल.दि 23 रोजी एकादशीला संध्याकाळी साडेसात वाजता रथोत्सव आहे. गेल्या वर्षाप्रमाणे गावातून मिरवणूक न काढता रथाला बाहेर काढून धुण्यात येईल. वाडी संस्थानमध्ये लालजींची मूर्ती ठेवून पूजा करून पाच पावले रथ ओढून पुन्हा जागेवर विसर्जन करण्यात येईल.

द्वादशीला दि.24 रोजी अंबर्शी टेकडीवर बेलापूरकर महाराज यांचा खिरापतीचा कार्यक्रम होईल. त्रयोदशीला गरुड हनुमंताचे वहन असते. मात्र याच दिवशी कृतीकाक्षय असल्याने पुण्यतिथीचा कार्यक्रम होईल. पुण्यतिथीला दरवर्षी सव्वा पाच पोत्यांचा भात करून त्याची पूजा करून रात्री लोकांना प्रसाद वाटप केला जातो. यावर्षीही मात्र फक्त सव्वा पोत्याचा भात केला जाईल. रथाच्या पाचव्या दिवशी पौर्णिमेला पालखी मिरवणूक असते. मात्र यंदा प्रतिपदेला पालखी सोहळा होईल. मिरवणूक न काढता सकाळी 6 वाजता पूजा करून बोरी पात्रात समाधी मंदिराला प्रदक्षिणा घालून तेथेच विसर्जन करण्यात येईल.

उत्सवाची परंपरा सलग दूसर्‍या वर्षी देखील खंडीत झाली आहे यात्रोत्सव रद्द करण्यात आल्याने शेकडो व्यवसाईकांचे रोजगार बूडाला असून बालगोपालांसह सर्वांनाच आनंदाची पर्वणी ठरलेल्या या यात्रेने कोरोनामूळे आनंदावर विरजण पडले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com