मांडळ येथे वाळू माफियांमध्ये 'फ्री स्टाईल '

मांडळ येथे वाळू माफियांमध्ये 'फ्री स्टाईल '

कळमसरे / अमळनेर - Amalner :

येथून जवळच असलेल्या मांडळ येथे वाळू चोरीची खबर देतो या कारणावरून दोन गटात तुफान हाणामारी होऊन सुमारे 11 जण जखमी झाले असून रात्री उशिरापर्यंत दोन्ही गटातर्फे मारवड पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.

मांडळ येथून पांझरा नदीतून मोठ्या प्रमाणावर अवैध रित्या वाळू उपसा सुरू असून मिळालेल्या माहितीवरून पोलीस व महसूल विभागातर्फे कारवाई झाल्याने वाळू चोरांमध्ये नाराजी पसरली होती. त्यात एकमेकांवर संशय घेऊन वाळू ची माहिती पुरवतो या कारणावरून दोघांमध्ये वाद सुरू झाले त्याचे पडसाद झटापटीत होऊन दोन्ही गटातर्फे जमाव जमा होऊन एकमेकांना लाकडी दांडके तसेच इतर साहित्याने मारहाण करण्यात आली.

नदी पात्रात तसेच गावात देखील हाणामार्‍या झाल्या. त्यात काहींचे डोके फुटले तर काहींचे पायावर वार करण्यात आले, काहींना हाताला लागले होते. काही जखमी मांडळ येथील दवाखाण्यात उपचारसाठी गेले असता संतप्त जमावाने दोन खाजगी दवाखान्याची देखील मोडतोड केली आहे.

घटनेचे वृत्त कळताच प्रांताधिकारी सीमा अहिरे, तहसीलदार मिलिंद वाघ यांनी तलाठी तिलेश पवार, प्रकाश महाजन, प्रदीप भदाणे, सचिन बमनाथ, सतीश शिंदे यांना पांझरा नदी पात्रात पाठवले तोपर्यन्त वाळूचोर ट्रॅक्टर घेऊन पळाले होते. तर सहाययक पोलीस निरीक्षक राहुल फुला, हेडकॉन्स्टेबल विजय होळकर, संभाजी पाटील, मनोज पाटील राहुल चौधरी यांनी गावात जाऊन शांतता केली. पोलीस आल्यानंतर जमाव पांगला होता. सागर अशोक कोळी, पंकज संजय कोळी, विशाल अशोक शिरसाठ, संजय ढोमन कोळी, योगेश हिलाल कोळी, गोकुळ बाबू शिरसाठ, ज्ञानेश्वर प्रकाश कोळी, राकेश वसंत कोळी, अमोल सखाराम कोळी, मका ढोमन कोळी हे 11 जण जखमी झाले असून त्यातील तीन जणांच्या डोक्यावर गंभीर जखमा तर काहींच्या पायावर गंभीर जखमा झाल्या आहेत.

दोन्ही गटातर्फे रात्री उशिरापर्यंत मारवड पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस उपनिरीक्षक संदीप पेठकर , प्रकाश साळुंखे , संजय पाटील , सुनील आगवणे , सुनील तेली , विशाल चव्हाण यांच्या पथकाला मांडळ गावात पेट्रोलिंग लावून रात्री आरोपींची धरपकड सुरू होती. घटनेमुळे गावात घबराहट निर्माण झाली होती. वाळू चोरांच्या मुजोरीमुळे कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com