‘श्वासा’च्या रुपात ‘सावित्री’ धावून आल्याने युवकाची मृत्यूवर मात

‘श्वासा’च्या रुपात ‘सावित्री’ धावून आल्याने युवकाची मृत्यूवर मात

अमळनेर - राजेंद्र पोतदार :

आयुष्याची दोरी पक्की असली तर मृत्युच्या दाढेतूनही परतता येते याची प्रचिती नुकतीच अमळनेरकरांना आली.

प्रत्यक्षात त्यांना अमळनेर आणत असताना अनेकांनी श्रद्धांजली अर्पण केली असताना हीच श्रद्धांजली जे.डी.यांच्या प्रकृतीत सुधारणेसाठी प्रार्थनेत परिवर्तीत झाली. अनेकांनी सोशल मीडियावर प्रार्थना करून त्यांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचा ओघ मोठ्या प्रमाणात सुरू केला. यानिमित्ताने अमळनेरकरांचे हृदयस्पर्शी मन पाहायला मिळाले. मृत्यूच्या दारात असतानाही त्यांचा श्वास सुरू असल्याने 5 रोजी त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली. ती यशस्वी झाली असली तरी काहीअंशी त्यांची तब्बेत नाजूक असल्याने अजून 5 दिवस त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

खरे तर श्वासाच्या रुपाने सावित्रीच त्याच्यासाठी धावून आल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही आणि म्हणूनच जयवंत ढवळे या युवकाने श्वासाच्या जोरावरच मृत्यूला परतवून लावल्याच्या सुखद घटनेने सार्‍यांना दिलासा मिळाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, अपघातात डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या जयवंत ढवळे नामक युवकाचा मृत्यू झाल्याच्या मानसिकतेतून धुळ्याहून उपचार करून अमळनेरला शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर त्याचा श्वास अजूनही सुरू असल्याचे समजले.

निव्वळ त्याच्या आयुष्याची दोरी बळकट असावी, म्हणून तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा धुळे येथील खासगी रुग्णालयात युवकाचे ऑपरेशन केल्याने तो बचावल्याची घटना घडली आहे. देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणेच ही स्थिती आज अमळनेरकरांना दिलासादायक देणारी ठरली आहे.

विशेष म्हणजे युवकाच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर व्हायरल होताच या युवकाला श्रध्दांजली वाहणार्‍या मित्र परिवारानेच सुमारे 3 लाख रक्कम गोळा करून माणुसकीचे दर्शन घडविले. ऑपरेशन यशस्वी झाले असले तरी सध्या त्याची प्रकृती नाजूक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

शहरातील गलवाडे रोडवर दि.3 रोजी रात्री 9 वाजता फोटोग्राफर जयवंत ढवळे उर्फ जे.डी. हे आपल्या निवासस्थानी भोजन आटोपून शतपावलीसाठी गलवाडे रोडने निघाले होते. दाजीबानगरपुढे अज्ञात वाहनाने त्यांना मागून धडक दिल्याने ते जबर जखमी झाले. जखमी अवस्थेत त्यांना डॉ. अनिल शिंदे यांच्या नर्मदा मेडिकल फाउंडेशन येथे आणण्यात आले.

परंतु, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला असल्याने डॉक्टरांनी त्यांना धुळे येथे हलविण्याचा सल्ला दिला. यामुळे रुग्णवाहिकेतून त्यांना धुळे येथील सेवा क्रिटिकल केअर येथे हलविण्यात आले. धुळे येथे 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 पर्यंत मृत्यूशी त्यांची झुंज सुरू होती.

व्हेंटिलेटरवर असताना अमळनेरात अनेक जण त्यांच्यासाठी प्रार्थना करीत होते. मात्र, यादरम्यानच्या काळात प्रकृतीत सुधारणा होणे कठीण वाटल्याने डॉक्टरांनी त्यांना परत घरी नेण्याचा सल्ला दिला होता. शेवटी नाईलाजास्तव त्यांचे व्हेंटिलेटर काढून त्यांना अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.

परंतु, त्यांची श्वास प्रक्रिया न थांबल्याने नातलगांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. अखेर सर्वांच्या आग्रहास्तव त्यांना पुन्हा त्यांना रात्री 8 वाजता धुळे येथे हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. अनिल शिंदे यांच्या सल्ल्यानुसार त्यांना धुळे येथे हलविण्यात आले.

विशेष म्हणजे सोशल मीडियातील ग्रुपमधील मित्र परिवारातील डॉक्टर, पोलीस, पत्रकार, अधिकारी, फोटोग्राफर व इतर सर्वांनी आर्थिक मदत केल्याने कुटुंंबीयांना हायसे वाटले. जयवंत ढवळे हा तरूण सर्व सामान्य कुटुंबातील असून फोटोग्राफीचा व्यवसाय करतो. सतत हसतमुख व मित्र परिवारानेही सध्याच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीही मदतीचा हात पुढे करून दातृत्व दाखविले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com