मद्यप्राशनाचा व्हीडीओ व्हायरल प्रकरणी निरीक्षक अखेर निलंबित
जळगाव

मद्यप्राशनाचा व्हीडीओ व्हायरल प्रकरणी निरीक्षक अखेर निलंबित

Ramsing Pardeshi

जळगाव | प्रतिनिधी -

मद्यप्राशन करीत परमीट रुम बियरबारमध्ये हॉटेलच्या रेकॉर्डची तपासणी करताना सोशल मीडियावर व्हीडीओ व्हायरल झाल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नरेंद्र दहीवडे यांना निलंबित करण्यात आले आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केली आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिली.

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक नरेंद्र दहीवडे हे एका मद्याच्या दुकानात मद्यसाठ्याची तपासणी करताना दारू रिचवत असल्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याप्रकरणी अधीक्षक धार्मिक यांनी दहिवडे यांना शो कॉज नोटीस बजावली होती. त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात आला. यासंदर्भात चौकशीबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवण्यात आला होता. यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे नाशिक विभागीय उपायुक्त ए.एन.ओहोळ सोमवारी जळगाव येथील कार्यालयात आले होते.

व्हायरल झालेला व्हीडीओ सन २०१८ मधील जळगावातील एका हॉटेलमधील असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. याबाबत अधीक्षक धार्मिक यांनी अहवाल तयार करुन तो उपायुक्तांकडे सादर केला. त्यांनी राज्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्याकडे हा अहवाल पाठविला होता. याप्रकरणी सोमवारी रात्री निलंबनाची कारवाई झाली. निलंबन काळात दहिवडे यांना मुख्यालय जळगाव शहर देण्यात आले आहे.

Deshdoot
www.deshdoot.com