दारुचा महापूर रोखण्याचे पोलिसांसह गावकर्‍यांपुढे आव्हान

‘गावात वाटली दारु तर उमेदवाराला नक्की पाडू’चा संदेश व्हायरल
दारुचा महापूर रोखण्याचे पोलिसांसह गावकर्‍यांपुढे आव्हान

जळगाव - Jalgaon - प्रतिनिधी :

ग्रामपंचायत निवडणूक म्हणजे गावाच्या अस्मितेचा प्रश्न. कोणत्याही परिस्थितीत आपल्या पॅनलला निवडून आणून आणि गावावर वर्चस्व निर्माण करण्यासाठी गटप्रमुखांंची धडपड सुरु आहे.

यासाठी साम,दाम,दंड भेद या नीतीचा वापरही केला जातो. त्यातच निवडणूक म्हटली की ग्रामीण भागात दारुचा महापूर वाहतो.

मात्र, आता सोशल मीडियावर या निवडणुकीत ‘गावात वाटली दारु तर उमेदवाराला नक्की पाडू, असा संदेश व्हायरल होत आहे.

सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यासाठी तयार केलेला हा संदेश आता जिल्हाभर व्हायरल होत आहे. मात्र,दारुचा महापूर रोखण्याचे पोलिसांसोबत गावकर्‍यांपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे.

जिल्ह्यात 783 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी माघारीअंती 7 हजार 213 जागांसाठी 13 हजार 847 उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होत आहे. मंगळवारपासून या निवडणुकीची रणरधुमाळी गावागावात सुरु झाली आहे.

प्रत्येक उमेदवार आणि त्यांचे समर्थक या निवडणुकीची जय्यत तयारी करीत आहेत. घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत.

निवडणूक गावाची असली तरी रंगत मात्र लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा मोठी आहे.या निवडणुीत ग्रामीण ग्रामीण भागात दारुचा महापूर वाहतो. उमेदवार मतदारांना आकृष्ट करण्यासाठी दारुचे वाटप करीत असल्याचा आजवरचा अनुभव आहे.

अलीकडे सोशल मीडिया सर्वत्र सक्रिय आहे. ग्रामीण भागातही त्याला अपवाद नाही. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन आहे.

सोशल मीडिया आणि ग्रामपंचायत निवडूक यामुळे वेगळी राहणार तरी कशी ? प्रचारासोबतच विविध गमंतीजमतीही सोशल मीडियावरुन निवडणुकीसंदर्भात व्हायरल होत आहेत. गावाची निवडणूक असली तरी अनेक गटांनी व्हॉटसअ‍ॅपवर आपले ग्रुप तयार केलेले आहेत. या माध्यमातून प्रचाराची रणनीती आखली जात आहे.

सोशल मीडियावरुन समाजप्रबोधनात्मक संदेश

प्रचारासोबतच काही समाजप्रबोधनात्मक संदेशही व्हायरल होत आहे. ग्रामपंचायत निवडणूक सुदृढ वातावरणात व्हावी, अशी प्राासनासोबतच गावातील नागरिकांची इच्छा असते. परंतु, दारुमुळे निवडणुकीला गालबोट लागण्याची शक्यता असते.

त्यामुळे ‘जर गावात वाटली दारु तर उमेदवाराला नक्की पाडू’ हा संदेश व्हायरल होत आहे. गावागावात सोशल मीडियावरुन हा संदेश पाठवून दारुबंदीसोबतच समाजप्रबोधनात्मक संदेशही दिला जात आहे.

एकंदरीत ग्रामपंचायत निवडणुकीने संपूर्ण ग्रामीण भाग ढवळून निघाला असून त्यात आता सोशल मीडियाही सहभागी झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com